25 September 2020

News Flash

‘ब्रुस ली’च्या जीवनावर शेखर कपूर बनवणार चित्रपट

ब्रुस लीच्या आयुष्यावर तत्पूर्वी ‘द ग्रँड मास्टर’ आणि ‘आयपी मॅन’ हे दोन चित्रपट येऊन गेले आहेत.

Director Shekhar Kapur is helming the Bruce Lee biopic titled Little Dragon

अ‍ॅक्शनपट हा सध्या जगभरातील प्रेक्षकांच्या आवडीचा विषय आहे. या अ‍ॅक्शन चित्रपटांची सुरुवात खऱ्या अर्थाने ‘ब्रुस ली’ या अभिनेत्याने केली. अभिनेता म्हणून सुमार असणाऱ्या ब्रुस लीने आपल्या अजब ‘कुंग फू फाइट’ शैलीतून अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. पुढे याच ‘ब्रुस ली’च्या फाइट शैलीचे अनुकरण करत जॅकी चॅन, जेट ली, डोनी येन, नीना ली यांसारखे अनेक अभिनेते ‘अ‍ॅक्शन स्टार’ म्हणून नावारूपाला आले. या सुपरस्टारच्या आयुष्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर ‘लिटिल ड्रॅगन’ नामक चित्रपटाची निर्मिती करतायेत. हॉलीवूड आणि बॉलीवूड दोन्हीकडे आपल्या दिग्दर्शन शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शेखर कपूर यांनी तत्पूर्वी ‘मासूम’, ‘भुला ना देना’, ‘मिस्टर इंडिया’, ‘बॅन्डिट क्वीन’, ‘पानी’ यांसारखे सुपरहिट हिंदी चित्रपट आणि ‘एलिझाबेथ’, ‘न्यूयॉर्क आय लव यू’, ‘एलिझाबेथ द गोल्डन एज’, ‘पॅसेज’ या हॉलीवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे; परंतु ब्रुस लीच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणे हे त्यांच्यासाठी खरे आव्हान आहे.

ब्रुस लीच्या आयुष्यावर तत्पूर्वी ‘द ग्रँड मास्टर’ आणि ‘आयपी मॅन’ हे दोन चित्रपट येऊन गेले आहेत; परंतु हे दोन्ही चित्रपट त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अगदी वरवर डोकावून गेले आहेत. शेखर कपूर यांच्या मते हा सिनेमा वरील दोन्ही चित्रपटांपेक्षा पूर्णत: वेगळा असेल. ब्रुस लीच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवर फार कमी संदर्भ उपलब्ध आहेत. ब्रूस ली हे पॉप स्टार मायकल जॅक्सनप्रमाणेच एक गूढ व्यक्तिमत्त्व होते. त्याचे फार कमी नातेवाईक होते. जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याची मुलगी शॅनन ली ही फक्त चार वर्षांची होती. त्यामुळे तिच्याकडून वडिलांविषयी मिळणारी माहिती फार वरवरची आहे. ब्रुस लीने ‘द किड’, ‘द बिग बॉस’, ‘फिस्ट ऑफ फ्यूरी’, ‘वे ऑफ द ड्रॅगन’ अशा ४१ चित्रपटांतून काम केले आहे. त्या दरम्यान चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आणि सहकलाकारांनी जो ब्रुस ली अनुभवला तसेच त्याच्याबरोबर मार्शल आर्ट शिकलेल्या फार मोजक्या लोकांच्या त्याच्याबद्दलच्या आठवणी.. हे सर्व संदर्भ एकत्र करून त्याचे व्यक्तिमत्त्व या चित्रपटात रेखाटण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2019 10:07 am

Web Title: director shekhar kapur is helming the bruce lee biopic titled little dragon
Next Stories
1 ‘बाबासाहेबांना देव करून त्यांची मंदिरं करायच्या आधी…’
2 ‘गेम ऑफ थ्रोन्स’… ही नक्की भानगड आहे तरी काय?
3 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निखिलचा मतदारांना मोलाचा सल्ला
Just Now!
X