आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत ‘चैतन्य’मय कामगिरी करत ‘द डिसायपल’ चित्रपटाने रविवारी टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘अ‍ॅम्प्लिफाय व्हॉईसेस’ पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार फिलीप लकोटे दिग्दर्शित ‘नाईट ऑफ किंग्ज’ आणि ‘द डिसायपल’ या चित्रपटांना विभागून देण्यात आला.

व्हेनिस चित्रपटात महोत्सवात गोल्डन लायन पुरस्कार पटकावणाऱ्या क्लोए झाओ दिग्दर्शित ‘नोमॅडलँड’ या चित्रपटाला पीपल्स चॉईस पुरस्काराने गौरवण्यात आले. शनिवारी मीरा नायर यांच्या बीबीसी स्टुडियो निर्मित ‘अ सुटेबल बॉय’ या मालिकेने टोरंटो चित्रपट महोत्सवाची सांगता करण्यात आली. या निमित्ताने चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच दूरचित्रवाणी मालिका प्रदर्शित झाली.

‘द डिसायपल चित्रपटात एका भारतीय शास्त्रीय संगीतकाराची कथा मांडण्यात आली असून, यात पारंपरिक शिस्त आणि तत्कालीन प्रेरणा यांचा उत्तम मिलाफ दिसून येतो’,अशा शब्दात समीक्षकांनी चित्रपटाची प्रशंसा केली. एका तरुण शास्त्रीय संगीतकराची कहाणी पडद्यावर मांडणाऱ्या या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात एफआयपीआरईएससीआय संस्थेतर्फे  देण्यात येणारा ‘इंटरनॅशनल क्रि टीक्स’ तसेच सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच दक्षिण कोरियातील बुसान चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची निवड झाली आहे.