गेल्या दोन दशकांमध्ये संगीतकार म्हणून ए. आर. रेहमानने केवळ भारतावर नव्हे तर जगावर गारूड केलं आहे. आत्तापर्यंत १३० चित्रपटांना संगीत, दोनदा ‘ऑस्कर’ पुरस्कार, एक ‘ग्रॅमी’ पुरस्कार अशी कारकीर्द असणाऱ्या रेहमानच्या संगीतात नेमकी जादू काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजवर झालेला नाही. पौर्वात्य संवेदना आाणि पाश्मिचात्य संगीत यांचा मिलाफ ही रेहमानच्या संगीताची ओळख म्हटली जाते. मात्र त्याचा तिथवरचा प्रवास कसा होता? हे अजून फारसे कोणाला माहिती नाही. रेहमानची एक व्यक्ती ते जागतिक स्तरावरचा संगीतकार अशी झालेली जडणघडण उलगडण्याचा प्रयत्न ‘जय हो’ या कार्यक्रमाद्वारे करण्यात आला असून ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

‘जय हो’ या नव्वद मिनिटांच्या कार्यक्रमात रेहमानचे बालपण, त्याच्या कारकीर्दीच्या अनेक विलक्षण कथा पहिल्यांदाच लोकांसमोर येणार आहेत. ‘रोजा’ हा त्याचा संगीतकार म्हणून हिंदीतला पहिला चित्रपट. या चित्रपटापासून दिग्दर्शक मणिरत्नमशी रेहमानची जोडी जमली. त्यानंतर ‘रंगीला’, ‘ताल’, ‘दिल से’, ‘रंग दे बसंती’, ‘लगान’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’, ‘रांझना’ असे किती तरी त्याच्या संगीताने नटलेले चित्रपट आणि त्यातील गाणी लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. मात्र संगीतकार म्हणून रेहमान कुठल्याही चौकटीत अडकून पडला नाही. आजही जागतिक स्तरावर भारतीय संगीताचा विषय निघाला तर रेहमानच्या उल्लेखाशिवाय तो सुरू होत नाही. एवढी लोकप्रियता मिळवणाऱ्या या संगीतकाराने नववीत असतानाच शाळेला राम राम ठोकला होता. तेव्हापासून ते संगीतकार म्हणून पहिला मानधनाचा धनादेश स्वीकारण्याच्या क्षणापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक उलथापालथी घडल्या. त्याचा विवाह, त्याचा विक्रम या सगळ्या गोष्टी ‘जय हो’मधून उलगडणार आहेत.

‘जय हो’चे दिग्दर्शन उमेश अग्रवाल यांनी के ले असून लॉस एंजेलिस, लंडन, मुंबई आणि चेन्नईत याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संगीताचा मिलाफ साधणारी त्याची संगीतशैली कशी विकसित होत गेली? याचा शोध या कार्यक्रमातून घेण्यात आला आहे. त्यासाठी रेहमानबरोबर काम केलेल्या गायक, संगीतकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांच्याशीही संवाद साधण्यात आला आहे. आमिर खान, मणिरत्नम, गुलजार, अलका याज्ञिक, सुभाष घई, शेखर कपूर, आशुतोष गोवारीकर, ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल आणि संगीतकार अ‍ॅन्ड्रय़ू लॉईड वेबर यांनी त्यांना समजलेल्या रेहमानविषयी सांगितलेल्या गोष्टींचाही या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. ‘ए. आर. रेहमान’ या नावामागची प्रतिभा, त्याची प्रतिमा, त्याची जादू आणि त्याचे जादूई संगीत असे सबकुछ सांगणारा ‘जय हो’ हा कार्यक्रम डिस्कव्हरी वाहिनीवर २६ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.