छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीची गच्छंती झाली होती. त्यानंतर दयाबेनच्या भूमिकेसाठी निर्माते नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. आता निर्मात्यांचा हा शोध संपला असल्याचे म्हटले जात. पण दयाबेनच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दिशा वकानीच्या जागी ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतील अभिनेत्री विभूति शर्माची वर्णी करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच विभूतिने या भूमिकेसाठी ऑडिशनही दिले असल्याच्या चर्चा आहेत.

सप्टेंबर २०१७ पासून दयाबेनच्या भूमिकेतील दिशा सुट्टीवर होती. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचे म्हटले जात होते. मालिकेच्या निर्मात्यांनी तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसु्द्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर न आल्याने अखेर दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडीशन सुरु करण्यात आले.

याआधी दिशाने परतण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने काम करण्याच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिली. पण यापुढे मालिकेच्या कथानकाची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणे योग्य नसल्याचे निर्मात्यांनी म्हटले होते.