आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी कायम तयार असणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता. ‘दिल्ली ६’, ‘भाग मिल्खा भाग’ किंवा मग ‘बदलापूर’ या चित्रपटांमधून दिव्याच्या दमदार अभिनय कौशल्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चित्रपटात किती मिनिटांची भूमिका आहे याचा कधीच तिने विचार केला नाही. तर ती भूमिका किती प्रभावशाली आहे, याला तिने नेहमीच प्राधान्य दिलं. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने भूमिका निवडीविषयी तिची काही मतं मांडली. तर जास्त गोरेपणामुळे एकेकाळी तिला चित्रपट मिळाला नव्हता, याचाही खुलासा तिने या मुलाखतीत केला.

“भूमिका ग्लॅमरस असणं महत्त्वाचं नाही”

दिव्याने करिअरच्या सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर यायचं ठरवलं होतं. मात्र ‘वीर-झारा’मध्ये साकारलेल्या भूमिकेनंतर हा दृष्टिकोन बदलल्याचं दिव्याने सांगितलं. “भूमिका ही फक्त ग्लॅमरस असणं महत्त्वाचं नसतं हे मला ‘वीर-झारा’नंतर कळलं. एखादी साधी भूमिका तुम्ही किती प्रभावी पद्धतीने मांडू शकता हे जास्त महत्त्वाचं असतं. सध्या ग्लॅमरपेक्षा चित्रपटाची कथा आणि भूमिकेकडे लोकांचा कल अधिक आहे. इतकंच नव्हे तर मला एका दिग्दर्शकाने सांगितलं होतं की, एका प्रसिद्ध अभिनेत्रीला चित्रपटातील माझी भूमिका साकारायची इच्छा होती. एकेकाळी भूमिका छोटी असल्यास ती नाकारली जात होती. पण आता छोटी भूमिका प्रभावशाली आहे का हे आधी विचारलं जातं”, असं ती म्हणाली.

गोरेपणामुळे गमावली भूमिका

अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूने ‘सांड की आँख’ या चित्रपटात वयोवृद्धांची भूमिका साकारली होती. यातील त्यांच्या मेकअपवरून बरेच प्रश्न विचारले गेले. याबाबत दिव्याने तिचं मत मांडलं. ती म्हणाली, “सारांश या चित्रपटात अनुपम खेर यांनी वृद्धाची भूमिका साकारली होती तर नरगिसजींनी करिअरच्या शिखरावर असताना मदर इंडिया चित्रपटात आईची भूमिका साकारली होती. भूमिका कोण साकारतंय यापेक्षा ती कशा पद्धतीने साकारली जातेय हे महत्त्वाचं आहे. मी गोरेपणामुळे एक चित्रपट गमावला होता. दिग्दर्शकांना खेडेगावातल्या महिलेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री हवी होती. ते मला म्हणाले की, तू या भूमिकेसाठी योग्य आहेस पण तू फार गोरी आहेस. माझ्या वर्णामुळे भूमिका न मिळाल्याची खंत मला आजही आहे. पण मी एक अभिनेत्री आहे. दिल्ली ६ चित्रपटात मी सावळी दिसावी यासाठी तसा मेकअप करण्यात आला होता. पहाटे चार वाजता मी मेकअपसाठी सेटवर जायचे.”