‘डोंबिवली फास्ट’, ‘श्वास’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘अजिंक्य’ यांसारख्या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटाची निर्मिती करत असून त्यात तो मुख्य भूमिकादेखील साकारणार आहे. त्याचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘जे जातं तेच परत येतं?’ अशी टॅगलाइन या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यामुळे उत्तम कथानकासह प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदीही अनुभवायला मिळेल.

संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अत्यंत लक्षवेधी आहे. कारण, कथानकाचा नायक त्याची पत्नी आणि मुलीसह उभा आहे. त्या तिघांच्याही चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थतेचे आहेत. स्वाभाविकच त्यांच्या बाबतीत काय घडलं असेल याचं कुतूहल या पोस्टरमधून निर्माण होतं. ‘Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मूळ आहे,’ ही म्हण मध्यमवर्गीयांमध्ये किती खोलवर रूजलेली आहे याचं चित्रं उभं करणारा हा चित्रपट आहे.

Video : संगीत सोहळ्यात व्रिकांत- इशाचा रोमॅण्टिक डान्स

‘ही कथा मला सुचली मुलुंड – सीएसटीच्या एका प्रवासात… संदीप कुलकर्णीला ती आवडली. आपला पहिला चित्रपट कसा असावा या बाबतीत मी आग्रही होतो. निर्माता म्हणून संदीपने तो आग्रह पूर्ण केला. तो नट म्हणून जितका प्रगल्भ आहे, तितकाच निर्माता म्हणूनही आहे. खरंतर तो माझा कॉलेजपासूनचा दोस्त. आम्ही एकत्र नाटकातून कामं केली होती. निर्माता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे (प्रेमसूत्र) मी संवादही लिहिले होते. सुरुवातीला हा चित्रपट करताना मला जराही ताण नव्हता. पण जेव्हा तो बाय-लिंग्वल (हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांत) करायचा ठरला तेव्हा थोडं दडपण आलं. कारण या चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. नावामुळे हा ‘डोंबिवली फास्ट’चा सिक्वेल आहे असं वाटेलही… पण यापेक्षा समर्पक दुसरं नाव सुचलंच नाही. उद्या झालीच त्याच्याशी तुलना तरीही बरंच आहे. एका चांगल्या चित्रपटाशी तुलना होणं केव्हाही चांगलंच,’ असं लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितलं.

२२ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.