दिग्दर्शक कबीर खान यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता सलमान खानबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण असणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली असतानाच खुद्द कबीर खान यांनी हे वृत्त फेटाळले. माझ्या आगामी चित्रपटात सलमानसोबत दीपिका दिसणार असल्याचे वृत्त म्हणजे माध्यमांनी काढलेला तर्क आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत वाट पाहा, असे ट्विट कबीर खान यांनी केले.
पुढीलवर्षी ईदच्या सुमारास हा नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे नक्की आहे. मात्र, अभिनेत्री कोण, याबाबत अद्याप गोपनीयता आहे. सलमानसोबत दीपिका दिसणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे.
काही महिन्यांपूर्वी कबीर खान यांच्या आगामी चित्रपटात ह्रतिक रोशन आणि दीपिका पदुकोण दिसणार असल्याचीही चर्चा रंगली होती. पण तो विषय नंतर मागे पडला आहे.