News Flash

वाहिन्यांत भीम दिसतो गा..

बहुजनांना अभिप्रेत असलेला आशय वाहिन्यांवर येत्या एक-दोन वर्षांत येऊ  लागला आहे, परंतु यंदाच्या वर्षी त्याचे अधिक व्यापक स्वरूप पाहायला मिळाले.

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश अडसूळ

वाहिन्या केवळ प्रस्थापितांचे प्रतिनिधित्व करतात, असा आरोप कायम केला जातो, कारण गेली काही वर्षे वाहिन्यांवरून दाखवला जाणारा आशय हा सामान्य किंवा मध्यमवर्गीय जगण्याच्या  पलीकडचा आहे. मोठाले बंगले, आलिशान गाडय़ा आणि भारदस्त आडनावे यांचा वाहिन्यांकडून सातत्याने रेटा लावलेला दिसतो. या मालिका प्रेक्षक आवर्जून पाहत असतात, परंतु त्यांच्या दैनंदिन जीवनाशी याचा काहीही संबंध नाही हे वास्तव स्वीकारूनच. मराठी मालिकाजगतात साधारण गेली तीन दशके सुरू असलेला हा ट्रेण्ड आता काहीसा बदलतो आहे. त्यातही विशेष म्हणजे वाहिन्या आता बहुजनवर्गाकडे सरकू लागल्या आहेत. याची प्रचीती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विविध वाहिन्यांवर जे कार्यक्रम दाखवले गेले त्यातून येते.

ज्या मंचावर केवळ शास्त्रीय आणि सुगम संगीतांच्या मैफिली रंगायच्या तिथे आता भीमगीतांचे सर्रास सादरीकरण वाहिन्यांनी केलेले दिसले, किंबहुना गेल्या काही महिन्यांत विविध वाहिन्यांवर झालेल्या मराठीतील अनेक ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून भीमगीतांचे सादरीकरण झालेले दिसते. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या महापरिनिर्वाणदिनी बऱ्याच वाहिन्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर थेट भाष्य करणारे कार्यक्रम सादर केले गेले. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर भीमगीत गायिका सुषमाताई यांचा जीवनप्रवास दाखवला गेला. तसेच भीमगीतांतून बाबासाहेबांना मानवंदनाही देण्यात आली. तर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दोन स्पेशल’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात ज्यांच्या शिंदेशाही आवाजाने महाराष्ट्राला वेड लावले असे आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या बंधूंची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान प्रेक्षकांना खास भीमगीतांची मेजवानी चाखायला मिळाली. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने थेट बाबासाहेबांच्या जीवनावर मालिका साकारली असल्याने मालिकाविश्वात परिवर्तनाची नांदी झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

बहुजनांना अभिप्रेत असलेला आशय वाहिन्यांवर येत्या एक-दोन वर्षांत येऊ  लागला आहे, परंतु यंदाच्या वर्षी त्याचे अधिक व्यापक स्वरूप पाहायला मिळाले. याविषयी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचे निर्माते नितीन वैद्य सांगतात, हा प्रवाह बदलण्यामागे बदलता प्रेक्षकवर्ग हे प्रमुख कारण आहे. ८० च्या दशकात दूरचित्रवाणी पाहणारा प्रेक्षकवर्ग हा पांढरपेशा उच्च मध्यमवर्गीय असा दिसतो. कारण अशाच वर्गाला तेव्हा टीव्ही पाहणे परवडण्याजोगे होते. ९०च्या दशकात झालेल्या आर्थिक उदारीकरणानंतर घराघरात टीव्ही पोहोचले, पण ते सामान्य माणसांच्या आणि बहुजनांच्या घरात पोहोचले नाहीत म्हणून तेव्हाही हा बदल घडला नाही म्हणूनच तथाकथित पुढारलेल्या मालिका आपल्याला पाहायला मिळाल्या. पण आता असे घर नसेल ज्यात टीव्ही नाही. त्यामुळे हाही प्रेक्षकवर्ग आपल्याकडे यावा या उद्देशाने आशयनिर्मिती केली जात आहे. आताचा प्रेक्षकवर्ग पाहिला तर मोठय़ा प्रमाणात बहुजनांकडून मालिका पाहिल्या जातात त्यामुळे बहुजनांची दखल घेणे हे आता वाहिन्यांना अपरिहार्य झाले आहे, असे वैद्य सांगतात. आज बाबासाहेबांची मालिका सर्व स्तरांतून पाहिली जाते, मालिकेत दाखवलेला अस्पृश्यांवरील अन्याय पाहून अनेक तथाकथित उच्चवर्णीय हादरून जातात. त्या भयाण वास्तवाची जाणीव त्यांना होते, असे अनेक अभिप्राय प्रेक्षकांकडून आल्याचेही वैद्य यांनी सांगितले. शिवाय वाहिन्यांमध्ये झालेला हा बदल स्वागतार्ह आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

‘एबीपी माझा’चे मुख्य संपादक राजीव खांडेकर सांगतात, वाहिन्या या सर्व स्तरातील लोकांकडून पाहिल्या जातात त्यामुळे वाहिन्यांवर दाखवला जाणारा आशयही सर्व स्तरांतील लोकांसाठी असायला हवा. बाकीच्या माध्यमांमध्ये अशा आशयाला फार स्थान दिले जात नाही म्हणून आपणही दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. मालिका दाखवणाऱ्या वाहिन्या अशा आशयाकडे आताच का वळल्या?, याबाबत मला सांगता येणार नाही. परंतु गेली बारा वर्षे आम्ही विविध कलाकारांच्या माध्यमातून भीमगीतांचे प्रक्षेपण करत आहोत. भंत राहुल बोधींचे प्रवचनही आम्ही दाखवले. विठ्ठल उमप, आनंद शिंदे, संभाजी भगत ते आताच्या कडुबाई खरातांपर्यंत प्रत्येकाला व्यासपीठ देण्यात आले. ‘सर्वव्यापी आंबेडकर’ अशी मालिकाही चालवली गेली. हे ज्ञान अमुक एका धर्माचे आहे म्हणून त्याच्याकडे पाहू नका, तर त्यातून चांगलं काय घेता येईल याकडे लक्ष द्या, असा सल्ला खांडेकर देतात. त्यांच्या मते, खंडोबाचा कार्यक्रम दाखवला की एक विशिष्ट वर्ग वाहिनीकडे येतो, गायनाच्या मैफिलीत शिंदे घराणे आले की लगेच वाहिन्यांचा टीआरपी वाढतो त्यामुळे वेगवेगळे समाज वाहिन्यांशी जोडले जातात, असे हे साधे गणित आहे.

‘आजही समाजात असा एक वर्ग आहे जे बाबासाहेबांच्या कार्याला पूर्णपणे स्वीकारत नाहीत, त्यामुळे दोन दशकांपूर्वी असा आशय वाहिन्यांवर आणणेच आव्हानात्मक होते. तेव्हा बहुजनांच्या मूलभूत गरजांबाबतही प्रश्न असल्याने टीव्ही आणि या समाजाचा दुरान्वये संबंध नव्हता. परंतु झपाटय़ाने झालेल्या जागतिकीकरणानंतर गेल्या चार-पाच वर्षांत घराघरात टीव्ही पोहोचले. आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा दर्जा वधारला. आणि या बदलासोबतच मालिकांचा आशय बदलला, असे लेखक आशीष पाथरे सांगतात. दरम्यानच्या काळात उमप, शिंदे अशी काही नावे आपल्या कलेतून जगभरात पोहोचली आणि त्यांना मिळालेली प्रसिद्धी वाहिन्याही नाकारू शकल्या नाहीत. विशेष म्हणजे या कलाकारांनी कधीही ‘जय भीम’ म्हणत भीमगीत सादर करायला लाज बाळगली नाही. म्हणून आज पर्यायाने वाहिन्यांवर भीमगीते दणक्यात वाजतात. असे सकारात्मक बदल घडत असताना बाबासाहेबांवर मालिका येणे यासारखे परिवर्तन नाही. कारण काहीही असो पण वाहिन्यांनातून भीम घराघरात पोहोचतो आहे यासारखी आनंदाची बाब नाही, असे पाथरे सांगतात. ‘मालिका हे माध्यम नसून आज व्यवस्था झाली आहे आणि त्या व्यवस्थेचा आपण एक भाग आहोत याची जाणीव प्रत्येक समाजाला झाली आहे. त्यामुळे व्यवस्थेलाही लोकांचा विचार करणे भाग असतेच,’ असेही ते सांगतात.

याविषयी ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे मात्र काहीशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्या मते, वाहिन्या या संवेदनशील असल्याने तिथे एखादी चूक झाली तर ती जगभर पोहोचते. त्यामुळे धार्मिक किंवा महापुरुषांवर मालिका करणे कायम जोखमीचे असते. म्हणून कदाचित वाहिन्यांना अशा मालिका कराव्यात का असा संभ्रम असावा. वाहिन्यांनी आजवर काय के ले नाही त्यापेक्षा आता त्या काहीतरी करू पाहत आहेत याकडे लक्ष द्यायला हवे. शिवाय ती वेळ आता निघून गेल्याने बदलाला सुरुवात झाली आहे.  तो आपण सगळ्यांनीच सकारात्मकरीत्या स्वीकारायला हवा, असेही राजवाडे सांगतात.  बाबासाहेबांवर मालिका करतानाही पुरावे आणि सत्यता पडताळूनच संहिता लिहिली जाते. या मालिकेचे यश म्हणजे सर्व स्तरांतील लोक ही मालिका आवर्जून पाहतात आणि त्यातले वास्तव स्वीकारून आम्हाला अभिप्रायही देतात.

मराठीतील अनेक वाहिन्या आता प्रस्थापित किंवा अभिजनांच्या आशयाची कात टाकून पुढे निघाल्या आहेत. यामागे असलेला अर्थकारण हा मूळ उद्देश कधीही झाकला जाणार नाही, परंतु कारण कोणतेही असो बदल झाला हेही स्वीकारणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा बदल केवळ मराठी वाहिन्यांपुरता उरलेला नाही, तो हळूहळू विस्तारतानाही दिसतो आहे. त्यामुळेच हिंदीतही ‘अ‍ॅण्ड टीव्ही’ वाहिनीवर बाबासाहेबांवरची मालिका नव्याने दाखल झालेली दिसते. वाढता बहुजन प्रेक्षकवर्ग पाहता उद्या एखाद्या बहुजन कुटुंबाची व्यथा मांडणारी मालिका प्रदर्शित झाली तर तेही सर्व स्तरांतील लोक सहज मनाने स्वीकारतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 4:18 am

Web Title: dr babasaheb ambedkar in marathi serial abn 97
Next Stories
1 ‘वडिलांबरोबर काम करायला आवडेल’
2 ‘थोडं तुझं, थोडं माझं’: मनोकायिक चकवा
3 आयुष्यावर गप्पा!
Just Now!
X