‘मिसेस श्रीलंका’ ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. पण या स्पर्धेतील एक अजब व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परिक्षकांनी या स्पर्धेची विजेती पुष्पिका डी सिल्वा असल्याचे सांगितले. पण नंतर काही वेळातच तिच्याकडून विजेतेपदाचं मुकूट हिसकावून घेण्यात आले.

एका यूट्यूब चॅनेलने ‘मिसेस श्रीलंका’ या स्पर्धेमध्ये झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिसेस श्रीलंका २०१९चे विजेतेपद पटकावणारी कॉरोलिन परिक्षक म्हणून सहभागी झाली होती. तिने पुष्पिकाला विजेती घोषित करुन मुकूट घातला होता. पण काही वेळा नंतर ती पुन्हा मंचावर आली आणि तिने पुष्पिकाचे मुकूट हिसकावून घेतले.

पुष्पिका ही घटस्फोटीत असल्यामुळे कॅरोलिनने तिला स्पर्धेसाठी अपात्र असल्याचे ठरवत उपविजेतीला मुकूट घातले. ‘मिसेस श्रीलंका’ ही स्पर्धा केवळ विवाहित महिलांसाठी असल्याचे कॉरोलिनने म्हटले.

व्हिडीओमध्ये कॉरोलिन बोलताना दिसत आहे की, मिसेस श्रीलंकास्पर्धेत तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही विवाहीत असायला हवे. हा स्पर्धेचा नियमच आहे. म्हणून मी विजेतेपदाचे मुकूट उपविजेतीला देते. दरम्यान पुष्पिकाचे मुकूट काढत असताना तिच्या डोक्याला दुखापत देखील झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

पुष्पिकाने फेसबुकवर या घटनेनंतर पोस्ट शेअर करत तिचे मत मांडले होते. ‘मी एक घटस्फोटीत महिला नाही. त्यांना जर वाटत असेल की मी घटस्फोटीत आहे तर त्यांनी माझे घटस्फोटाचे कागद आणून दाखवावेत. मी माझ्या पती पासून वेगळी झाले आहे पण आम्ही घटस्फोट घेतलेला नाही’ अशा आशयाची पोस्ट तिने केली होती.