वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ काल पार पडला. पण तरीही या संबंधीचा वाद मात्र अजूनही शमण्याचं नाव घेत नाहीये. या संदर्भात आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काल झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये न आलेल्या पुरस्कार विजेत्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसू नयेत म्हणून चक्क डमी माणसं बसवण्यात आली असल्याची माहिती एका पुरस्कार विजेत्यानेच दिली आहे.

मानाचा राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणे, कलाकारांसाठी सन्मानाची बाब असते. मात्र ठराविक लोकांना हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळेल आणि उर्वरित पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते मिळतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर सिनेविश्वातून या बाबत मिश्र प्रतिक्रियाही उमटल्या. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसेल, तर आम्ही पुरस्कार सोहळ्याला येणारच नाही , असे पुरस्कार विजेत्यांनी सांगितले आणि त्यानुसार या सोहळ्यावर बहिष्कार टाकला.

जेव्हा पुरस्कार सोहळा प्रस्तावित वेळेला सुरु झाला, तेव्हा पुरस्कार विजेते, त्यांचे कुटुंबीय आणि पाहुणे येऊन आपल्या खुर्च्या पकडून बसले. मात्र काही विजेत्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यामुळे आख्या २ रांगा रिकाम्याच राहिल्या. मग अशा वेळी प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात निमंत्रितांच्या खुर्च्या रिकाम्या असणे, योग्य दिसायचे नाही, म्हणून त्यांच्या जागेवर चक्क डमी लोकं बसवली, अशी माहिती खुद्द एका पुरस्कार विजेत्यानेच दिली.

काल सकाळी जेव्हा हा वाद पेटला, तेव्हा पुरस्कार समितीचे अध्यक्ष शेखर कपूर यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. ज्येष्ठ दिग्दर्शक कौशिक गांगुली, अतनु घोष यासारख्या सुमारे ६० पुरस्कार विजेत्यांनी पत्र लिहून राष्ट्रपतींकडे आपली खंत व्यक्त केली. परंतु, राष्ट्रपतींकडून कोणतेही उत्तर न आल्याने त्यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित न राहणेच पसंत केले.