डब्ल्युडब्ल्युई आणि हॉलिवूडमधील प्रचलित व्यक्तीमत्व ड्वेन जॉनसनने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. रेसलिंग आणि अभिनय क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या ड्वेन जॉनसनने इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत आपण पिता झाल्याची घोषणा केली.
ड्वेनला तिसरे कन्यारत्न झाले असून त्याने इन्स्टावर त्याचा आणि त्याच्या लहानग्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॉनसनने आपल्या मुलीला छातीशी कवटाळल्याचे दिसून येत आहे. “या जगात आणखी एका कणखर, निर्भीड मुलीचा जन्म झाला आहे. मला पुन्हा एकदा मुलीचा पिता होता आले ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. चिमुकलीच्या आगमनामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो”, असे कॅप्शन जॉनसनने दिले आहे.
दरम्यान, जॉनसनच्या या चिमुकलीचे नाव टियाना जिया जॉनसन असे ठेवण्यात आले आहे. टियानाच्या आगमनामुळे माझे आयुष्य परिपूर्ण झाले आहे. तसेच टियानाच्या जन्मामुळे माझ्या मनात स्त्रियांविषयीचा आदर आणखीनच वाढला आहे, असेही त्याने नमूद केले.
जॉनसन, ‘द रॉक’ या नावानेदेखील ओळखला जात असून तो ‘द रनडाऊन’, ‘बी कूल’, ‘ग्रिडआयरन गँग’, ‘द गेम प्लॅन’, ‘गेट स्मार्ट’, ‘प्लॅनेट ५१’, ‘टूथ फेरी’, ‘ड्रम’, ‘द अदर गाईज’ या चित्रपटांमध्ये झळकला आहे.