19 October 2019

News Flash

‘एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी’ शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला

आजची पिढी नेमकी कशी विचार करते? यावर कोणी फारसा विचार केलेला दिसत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

प्रत्येकाचा हा निर्णय आयुष्याला वेगळं वळण देणारा असतो. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा ‘फक्त तुमच्या मनाचाच कौल ऐका’, असं सांगू पाहणारा ‘एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी’  हा मराठी चित्रपट १८ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली आहे.

आजची पिढी नेमकी कशी विचार करते? यावर कोणी फारसा विचार केलेला दिसत नाही. या पिढीला काय हवंय, त्यांचे विचार, त्यांचा जीवनाविषयी दृष्टिकोन कसा आहे? ते आपल्या आयुष्याकडे, कुटुंबाकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे कोणत्या नजरेने पाहतात? हे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांतून दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. दोन पिढय़ांच्या विचारांमधील तफावतही यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखविण्यात आली आहे. हा विषय जरी आजच्या तरुणाईशी निगडित असला तरी घरातील प्रत्येकाचा दृष्टिकोन आणि विचार यामध्ये प्रतिबिंबित झाले आहेत.

स्वरंग प्रॉडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.

माणसाची निर्णयक्षमता, त्याला अनुसरून त्याने स्वत:साठी घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयांचे होणारे दूरगामी परिणाम यावर ‘एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी’ हा चित्रपट भाष्य करणार आहे.

First Published on January 13, 2019 12:20 am

Web Title: ek nirnay swatahacha swatasathi movie audiences meet on friday