प्रभा अत्रे यांच्या अकरा पुस्तकांचे प्रकाशन
शास्त्रीय संगीताचे भवितव्य उज्ज्वल असून काळानुरूप शास्त्रीय संगीतात जरी बदल झाला तरी त्याचा राग आणि ताल हा मूळ गाभा कायम राहील, असे प्रतिपादन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना केले. प्रभा अत्रे येत्या १३ सप्टेंबर रोजी ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यांचे ८५ व्या वर्षांतील पदार्पण आणि तीन वर्षांपूर्वी साजऱ्या झालेल्या ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळ्या’च्या निमित्ताने ‘स्वरमयी’ या संस्थेतर्फे ४ आणि ५ जून रोजी मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे ‘सहस्रचंद्र स्वर नृत्य प्रभा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय संगीत या विषयावर लिहिलेल्या अकरा पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. यात काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांचा तर काही पुस्तकांच्या हिंदी, इंग्रजी अनुवादांचा समावेश आहे.
या अकरा पुस्तकांमध्ये ‘बंदिश’ या विषयावरील तीन पुस्तकांचा समावेश असून त्याचा इंग्रजी अनुवादही या वेळी प्रकाशित होणार आहे. ज्यांना मराठी किंवा हिंदूी समजू शकत नाहीत त्यांच्याकडून याबाबत सातत्याने विचारणा केली जात होती. त्यामुळे या इंग्रजी ग्रंथातील बंदिशीही इंग्रजीत दिल्या आहेत, असे त्या म्हणाल्या. ‘स्वरमयी’ आणि ‘सुस्वराली’ या दोन ग्रंथात लेख आहेत. ‘स्वरमयी’ मध्ये माझी सांगीतिक वाटचाल, माझे गुरू, गुरुसमान व्यक्ती, माझी संगीत साधना, कलाविष्कार, शिक्षणात संगीताचे स्थान, संगीताचे रसग्रहण याविषयी लिहिलेले लेख आहेत. तर ‘सुस्वराली’ ग्रंथात संगीताची निर्मिती, संगीत शास्त्र तंत्र, संगीताचे घाट, संगीताचे प्रस्तुतीकरण आदी संगीताच्या विविध पैलूंवर लिहिलेले लेख आहेत. ‘सुस्वराली’ची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘स्वररंगी’ आणि ‘स्वरांगिनी’ ही दोन पुस्तकेही या सोहळ्यात प्रकाशित होणार आहेत. यापैकी ‘स्वररंगी’ या पुस्तकात ठुमरी, दादरा, गझल, भक्तीसंगीत, मराठी गझल यांचा संग्रह आहे. यात स्वरलिपी व ध्वनिफीतही सोबत देण्यात आली आहे. तर ‘स्वरांगिनी’ या पुस्तकात प्रात:कालीन, माध्यान्हकालीन आणि सायंकाळी गायल्या जाणाऱ्या रागांच्या बंदिशींचा समावेश आहे. तर ‘स्वरंजनी’ या पुस्तकात रात्रीच्या वेळेस गायल्या जाणाऱ्या रागांच्या बंदिशी असल्याची माहितीही प्रभा अत्रे यांनी दिली.
यासह ‘अलाँग द पाथ ऑफ म्युझिक’, ‘अंत:स्वर’ या पुस्तकांचे तसेच प्रभा अत्रे यांच्या काही जाहीर संगीत मैफलींच्या ध्वनिफितीचेही प्रकाशन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव, संगीतकार शेखर सेन यांच्या हस्ते होणार आहे. तसेच दोन दिवसांच्या या महोत्सवात अजय पोहनकर, व्यंकटेश कुमार, धनश्री पंडित-राय, साधना सरगम, आनंद भाटय़े, झेलम परांजपे हे मान्यवर गायक प्रभा अत्रे यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना सादर करणार आहेत.

काळानुरूप शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात काही बदल झाला आहे. मी लिहिलेल्या या पुस्तकांमध्ये माझे त्याबाबतचे विवेचन, शास्त्रीय संगीताचे शास्त्र, त्याचे सादरीकरण आणि या विषयासंदर्भात मला जे वाटते ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे
प्रभा अत्रे