यंदाच्या इंटरनॅशलन एमी पुरस्कारांवर भारतीय कलाकारांचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे. नुकतीच या पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अॅमेझॉन प्राइमवरील अत्यंत लोकप्रिय वेब सीरिज ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ आणि ‘दिल्ली क्राइम’ यांना बेस्ट कॉमेडी सीरिज व बेस्ट ड्रामा सीरिज या विभागात नामांकन मिळाले आहे. तसंच अभिनेता अर्जुन माथुर याला सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात नामांकन मिळालं आहे.

एमी हा ऑस्करप्रमाणेच टी.व्ही. मनोरंजन क्षेत्रातील नामांकित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा पुरस्कार पटकवणे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकाराचे जगभरातून कौतूक केले जाते. या पार्श्वभूमीवर विचार करता भारतीय मालिकांना एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळणे नक्कीच कौतुकास्पद आहे. या पुरस्कार स्पर्धेत एकूण २१ देशांमधील ४४ मालिकांना नामांकन मिळाले आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी एमी पुरस्कार सोहळा साजरा केला जाणार आहे. यावेळी या सोहळ्यात विजेत्यांची घोषणा केली जाईल.

अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेली ‘मेड इन हेवन’ ही वेब सीरिज तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या सीरिजमध्ये अभिनेता अर्जुन माथुर मुख्य भूमिकेत झळकला असून त्याच्या कामाची दखल एमी पुरस्कारामध्ये घेण्यात आली आहे. अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात नामांकन मिळालं आहे. त्याच्यासोबतच ‘रिस्पॉन्सिबिल चाइल्ड’फेम बिली बॅरेट, ‘1994’ मधील गीडो कॅप्रिनो आणि ‘इम्प्योरिस’मधील रफायल लोगम यांनादेखील नामांकन मिळालं आहे.