बॉलिवूड सिनेसृष्टीत ‘द सिरीअल किसर’ म्हणून नावलौकीक मिळवणारा अभिनेता इमरान हाशमी आता वेब सिरीजध्येही पाऊल ठेवत आहे. नेटफ्लिक्सवरील ‘बार्ड ऑफ ब्लड’ या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान या वेब मालिकेच्या निमित्ताने घेतल्या गेलेल्या एका मुलाखतीत त्याने “मी अनेकदा केवळ पैशांसाठीच काम केले” असे आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केले आहे.

कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड सिनेसृष्टीत दिर्घ काळ टिकून राहणे ही अत्यंत कठीण बाब आहे. परंतु इमरान हाशमीने ते करुन दाखवले. २००३ साली फूटपाथ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा इमरान गेली दोन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान मर्डर, गँगस्टर, द डर्टी पिक्चर यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला. परंतु त्याच वेळी केवळ पैसे मिळवण्यासाठी काही दर्जाहीन चित्रपटांमध्येही त्याला काम करावे लागले. असे त्याने या मुलाखतीत म्हटले आहे.

“बॉलिवडमध्ये काम मिळवणे सोपे आहे. परंतु एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून टिकून राहणे ही अत्यंत कठीण बाब आहे. यासाठी अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. अनेकदा नकोशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा देखील साकाराव्या लागातात. मी माझ्या कारकिर्दीत बऱ्याचदा इतर कलाकारांनी नाकारलेले चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमध्ये मला निर्मात्यांच्या आग्रहाखातर इंटीमेट सीन्स देखील करावे लागले. या प्रकारच्या दृष्यांचा माझ्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम झाला.

परंतु तरीही त्यांना मी नकार दिला नाही. कारण प्रत्येक वेळी दर्जेदार पटकथा असलेला चित्रपट तुमच्या वाट्याला येइलच असे सांगता येत नाही. आणि फक्त चांगले कथानक असलेल्याच चित्रपटांना निवडायचे असे जर ठरवले तर अभिनेता म्हणून टिकून राहणे मला शक्य झाले नसते. शिवाय मी आर्थिक संकटातही अडकलो असतो. आणि असे संकट स्वत:हून अंगावर ओढून घेणे हे माझ्या कुटुंबाला परवडणारे नाही, म्हणून अनेक चित्रपटांमध्ये मी केवळ पैसे मिळवण्याच्याच हेतूने काम केले.” असे इमरान हाशमीने या मुलाखतीत म्हटले आहे.