भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये २०१६ या वर्षात ज्या चित्रपटाने सर्वांनाच भारावून सोडले होते तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाने आणि त्यातील कलाकारांनीही प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. त्याचसोबत या चित्रपटातील लोकेशन्स पाहूनही प्रेक्षकांची गर्दी खेचू लागली होती. या चित्रपटात ज्या फांदीवर बसून परश्या आणि आर्चीचे प्रेम बहरले तिलाही प्रसिद्धीचं चांगलंच वलय मिळालं होतं. मात्र आता तीच फांदी तुटल्याचे वृत्त आले असून सोशल मीडियावर ‘सैराट’प्रेमी हळहळत आहेत.

करमाळ्यात असणा-या या झाडावर या गाण्यातला काही भाग चित्रित करण्यात आला होता. अजय-अतुल यांच्या ‘सैराट झालं जी…’ या गाण्यामध्ये एका वाळलेल्या झाडाच्या फांदीवर बसून आर्ची आणि परश्या आपल्या प्रेमाची कबुली देत असल्याचे दाखवण्यात आले होते. या झाडावरील ज्या फांदीवर आर्ची बसलेली होती, नेमकी तीच फांदी तुटली आहे. पर्यटकांनी सतत झाडावर चढ-उतार केल्यामुळे ही फांदी तुटल्याचं बोललं जात आहे.  झाडाची फांदी तुटल्याची बातमी सोशल मिडीयावर वेगाने पसरली आहे. तसेच, या झाडाचं खोडही दुभंगलं असून हे झाड आता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना याडं लावललेच पण त्यातील लोकेशन्सनेही लोकं सैराटली होती. खास करून हे झाडं तर सेल्फी पॉइंट झालं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या झाडाची ‘सैराट झाड’ अशी ओळख पुढे आली होती.

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास रचला. या चित्रपटाने महाराष्ट्रातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही याडं लावलं. ‘सैराट’मुळे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीला मिळाले. रिंकूला तर चित्रपटातील तिच्या अभिनयाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, सैराट या चित्रपटाच्या यशानंतर रिंकू राजगुरूचे असंख्य चाहते बनले आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री कुठेच दिसलेली नाही. ती सध्या नक्की करतेय तरी काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. तर ‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेल्या ‘मनसु मल्लिगे’ या चित्रपटात ती काम करत आहे. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.