निर्मात्यांना देण्यात आलेल्या निधीवरून ‘नाटय़ व्यावसायिक निर्माता संघा’त उद्भवलेल्या वादानंतर संघातून बाहेर पडलेल्या काही सदस्यांनी ‘जागतिक मराठी नाटय़धर्मी निर्माता संघा’ची स्थापना केली आहे. अमेय खोपकर यांच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

निधी वाटपानंतर कार्यकारिणीतील बहुतांश सदस्यांबरोबरच इतरही अनेक सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीमाना दिलेल्या सदस्यांनी पुढाकार घेत या नव्या निर्माता संघाची स्थापना केली आहे. या संघाच्या माध्यमातून नाटय़गृहांची दुरवस्था, कलाकारांसोबतच पडद्यामागील कलाकारांच्या अडचणी, तारखांचे घोळ हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उपाध्यक्ष महेश मांजरेकर यांनी सांगितले.

अनंत पणशीकर या नव्या संघाचे प्रवक्ते असून त्यांनी नव्या कार्यकारिणीची आणि सदस्यांची ओळख करून दिली. ज्येष्ठ निर्मात्या लता नार्वेकर आणि प्रशांत दामले संघाच्या प्रमुख सल्लागारपदी असून दिलीप जाधव कार्यवाह तर श्रीपाद पद्माकर सहकार्यवाह असतील. कोषाध्यक्ष चंद्रकांत लोकरे तर सुनील बर्वे, नंदू कदम कार्यकारिणी सदस्य असतील.

मराठी नाटक केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर नेण्यासाठी या संघाला ‘जागतिक मराठी नाटय़धर्मी निर्माता संघ’ असे नाव देण्यात आले आहे. मराठी नाटक जगभरात पोहोचवणे हे अध्यक्ष म्हणून माझे ध्येय असेल.

– अमेय खोपकर, अध्यक्ष, जागतिक मराठी नाटय़धर्मी निर्माता संघ