बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने गळफास लावून आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. परिणामी त्याच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी देखील सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. भारताने एक उत्कृष्ट कलाकार गमावला, असं म्हणत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

“उत्कृष्ट भारतीय कलाकार सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केली. या दुदैवी घटनेने अमानवीय जागतिक प्रशासनाकडे आपलं लक्ष वळवलं आहे. कुठलाही व्यक्ती आत्महत्या तेव्हाच करतो जेव्हा त्याच्या मुल्यांची उपेक्षा केली जाते. त्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केलं जातं.” अशा आशयाचे ट्विट करुन महमूद अहमदीनेजाद यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.