चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवाला यांना कर चुकविल्याप्रकरणी बॅलर्ड पियर इस्टेट कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. फिरोज नाडियादवाला यांनी तब्बल ८.५६ लाख रुपयांचा कर चुकविला आहे. नवीन आयकर कायद्यानुसार त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात नाडियादवाला हे सेशन्स कोर्टात अपील करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

फिरोज नाडियादवाला यांनी २००९-१० या वर्षातील टीडीएस कर भरला नव्हता. याप्रकरणी त्यांना वारंवार नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र या नोटीशींना त्यांनी काहीच उत्तरे दिली नव्हती. त्यांमुळे मार्च २०१४ मध्ये आयकर कमिश्नरने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील अमित मुंडे यांनी सरकारची बाजू मांडली.

२००९-१० या वर्षामध्ये एकाही नवीन चित्रपटाची निर्मिती न केल्यामुळे जुन्या चित्रपटांच्या कमाईवरच हे वर्ष सरलं. त्यामुळेच कर भरण्यास उशीर झाल्याचं स्पष्टीकरण नाडियादवाला यांच्या वकीलांनी दिलं होतं.त्यासोबतच नाडियादवाला यांनी योग्य वेळेत कर भरला असून त्यांना फसविण्यासाठी हा खटला टाकण्यात आल्याचंही नाडियादवाला यांच्या वकीलाचं म्हणणं आहे. मात्र ‘सुशिक्षित असूनही नाडियादवाला यांनी योग्य वेळेत कर भरला नाही’, असा दावा सरकारी वकील मुंडे यांनी केला.

दरम्यान, नाडियादवाला याच्यावर करचुकवेगिरीचा अजून एक खटला सुरू असल्याची माहितीही मुंडेंनी न्यायालयाला दिली. ‘चित्रपटाची निर्मिती केली नाही म्हणून टीडीएस भरला नाही अशी कारणं देणं योग्य नाही. सरकारला कर देणं हे आपलं कर्तव्य आहे’, अशी भूमिका न्या. आर. एस. सरकाळेंनी घेतली. नाडियादवाला याला तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.