जयेश शिरसाट

रोहित शर्मानंतर ‘हुब्लो’चा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर मीच होणार, ही महत्त्वाकांक्षा जगातल्या काही क्रिकेटवीरांना असू शकते. ‘एस्टी लॉडर’ने डायना पेंटीला निवडलं, माझ्यात काय कमी होतं, हा प्रश्न बॉलीवूडमधल्या अन्य तारकांना नक्कीच अस्वस्थ करू शकतो. अगदी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर नको, जाहिरातीत कामही नको, किमान ‘ब्रॅण्ड इन्फ्लुएन्सर’ म्हणून तरी संधी मिळेल, या आशेने रसिक-प्रेक्षकांवर ज्यांचा ज्यांचा प्रभाव आहे तो प्रत्येक जण धडपडतो आहे.

‘रोलेक्स’, ‘ओमेगा’, ‘नार्स’, ‘श्ॉनेल’, ‘टॉम फोर्ड’ या आणि अशा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सपासून हरप्रकारची देशी-विदेशी उत्पादनं, वित्त-विमा संस्था, सेवा पुरवठादार, ई कॉमर्स कंपन्या इतकंच नव्हे तर एखाद्या उपक्रमाने, चळवळीने ‘इनफ्लुएन्सर’ म्हणून निवडावं यासाठी प्रभावशाली मंडळी कासावीस झाली आहेत. बरं, काय लागतं त्यासाठी? आपापल्या क्षेत्रांतलं प्रावीण्य, स्वच्छ चारित्र्य, व्यक्तिमत्त्व? छे छे!! अलीकडे हे गुण पुरेसे नाहीत. सोशल मीडियावर फॉलोअर्सचा (चाहते) गोतावळा किती, हे महत्त्वाचं! इन्स्टाग्रामवर नावापुढे फॉलोअर्सचा आकडा ‘एल’ (लाख) की ‘एम’ (मिलियन/दशलक्ष), हे आधी पाहिलं जातं. त्यामुळे भल्याभल्यांना जाहिरातींचा जोडधंदा मिळेलच याची खात्री नाही.

पूर्वी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके ब्रॅण्ड्स त्या त्या क्षेत्रातल्या सुपरस्टार्सना घेऊन जाहिरात करण्यास आग्रही असत. पुढे हे समीकरण चांगलंच रुजलं. टीव्ही, रेडिओ, बॅनर्सपर्यंत मर्यादित असलेलं जाहिरातविश्व धावत्या तंत्रज्ञानावर स्वार होत सोशल मीडिया मार्केटिंगद्वारे (एसएमएम) आक्रमकपणे ग्राहकांवर आदळू लागलं. कधी थेट तर कधी पडद्याआडून! उदाहरणार्थ, क्रिकेट संघाचा कर्णधार जाहिरातीचा चेहरा असेल. तर तो या जाहिरातीत अभिनय करेल. सोबत या जाहिरातीचा/ उत्पादनाचा प्रसार सोशल मीडियावरील त्यांच्या अकाऊंटवरूनही करेल. चित्रपटातले कलाकारही याच पद्धतीने ब्रॅण्डिंग करतील आणि रसिकांची उत्सुकता चाळवतील.

वयाने सर्वात तरुण देश असलेल्या भारतात इन्स्टाग्राम हे एसएमएमचं प्रमुख माध्यम. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींच्या इन्स्टाग्राम पोस्ट बारकाईने पाहिल्यास मार्के टिंगची ही छुपी पद्धत लक्षात येते. काहीही संबंध नसताना एखादी वस्तू किंवा सेवेचा गोडवा गायचा. सामाजिक संदेशाआड ब्रॅण्ड्सचा प्रचार करायचा. व्यावसायिक, सार्वजनिक, खासगी आयुष्यातल्या छायाचित्रांमधून डोळ्यांवरचा गॉगल, मनगटी घडय़ाळ, कपडे, आंतरवस्त्रे, व्यायामाचं साहित्य, जेवणाच्या टेबलवर ठेवलेलं शीतपेय, भिंतीवरची चित्राकृती, हिरेजडित दागिने.. असे अनेक ब्रॅण्ड्स चाहत्यांचं लक्ष वेधून घेतील अशा पद्धतीने अलगद समोर आणायचे. या क्रियेला सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये ‘इन्फ्लुएन्सिग’ आणि जो हे करतो त्याला ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणतात.

अशा इन्फ्लुएन्सरना इन्स्टाग्रामवर उत्पादनाचा गोडवा गाणारी एक पोस्ट अपलोड करण्यासाठी कोटय़वधी रुपये मिळतात. अट एकच, चाहत्यांचा आकडा. तोही कोटीत हवा. कारकीर्दीत हजारो धावांचा डोंगर उभा केला काय किंवा लागोपाठ पाच हिट सिनेमे दिले काय, चाहते कमी तर भावही कमी. हे लक्षात येताच प्रभावशाली व्यक्तींनी आपापल्या सोशल मीडियाच्या घमेल्यात चाहते उपसायला सुरुवात केली. प्रसिद्धीच्या शिखरावर राहण्यासाठी काहीही करणाऱ्यांना निमित्त मिळालं. या झटापटीत सोशल मीडिया मार्केटिंग, अशा गोंडस नावाखाली सॉफ्टवेअरद्वारे (बॉट्स) एकाच वेळी हजारो बनावट खाती तयार करून चाहत्यांचा आकडा कृत्रिमरीत्या फुगवून देणारी यंत्रणा जन्माला आली. चाहते, त्यांच्या कॉमेंट्ससह लाइक्सही कृत्रिम. चाहत्यांचा वयोगट, लिंगाधारे विभागणी, भविष्यात चाहत्यांच्या अंदाजित संख्येचा ताळेबंदही बोगस. फक्त आपल्या ग्राहकाला म्हणजे इन्फ्लुएन्सरला काम मिळवून देणं आणि पर्यायाने आपली तुंबडी भरणं, हाच या यंत्रणेचा उद्देश. जाहिरातदारांकडून इतरांपेक्षा स्वत:चा भाव वाढवून घेण्यासाठी, सर्वाधिक प्रभावशाली ठरण्यासाठी आणि इतरांचा ‘बिझनेस’ बळकावण्यासाठी सेलिब्रेटींमध्ये स्पर्धा सुरू झाल्यामुळे भारतात विशेषत: मुंबईत चाहते वाढवणाऱ्या या टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे.

एकूण चाहत्यांपैकी निम्म्याहून अधिक प्रभावित होतील, चर्चा होईल, ती पसरेल, पहिल्यांदा कुतूहलापोटी उत्पादन विकत घेतलं जाईल आणि नंतर कायमस्वरूपी ग्राहक तयार होतील, हा जाहिरातदारांचा अनुमान होता. पण या कृत्रिम फुगवटय़ामुळे गेल्या वर्षी जाहिरातदारांचे १० हजार कोटी रुपये पाण्यात गेले, असा अंदाज ‘चेक’ या सायबर सुरक्षेवर कार्यरत संस्थेने काढला आहे. हा आकडा फक्त इन्स्टाग्रामवरील इन्फ्लुएन्सरशी निगडित आहे. ‘इन्स्टिटय़ूट ऑफ कंटेम्परारी म्युझिक परफॉर्मन्स’ने गेल्या वर्षी एक अहवाल प्रसिद्ध करून भारतातल्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींचे सुमारे ४५ टक्क्यांहून अधिक चाहते बनावट, कृत्रिम असल्याचा दावा केला होता.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे सर्वाधिक सात कोटी फॉलोअर्स आहेत. सचिन तेंडुलकरचे अडीच कोटी, प्रियांका चोप्रा-जोन्सचे साडेपाच कोटी, दीपिका पादुकोणचे पाच कोटी, कतरिना कैफचे चार कोटी फॉलोअर्स आहेत. कृत्रिमरीत्या फॉलोअर्स निर्माण करणं हा माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा आहे. हा धागा पकडत मुंबई गुन्हे शाखेने ५४ एसएमएम कंपन्या आणि या कंपन्यांकडून बनावट चाहते, लाइक्स, कॉमेंट्स विकत घेणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींचं पितळ उघडं पाडलंय. या घोटाळ्यात बॉलीवूड तारे-तारकांपासून, मेकअप आर्टिस्ट, स्ट्रगलर्ससह अन्य व्यावसायिकांचा सहभाग प्राथमिक तपासातून पुढे आला आहे. आतापर्यंत सुमारे दीड डझन प्रभावशाली व्यक्तींची चौकशी झाली आहे. त्यापैकी काहींनी आपल्या पीआर कंपन्यांवर खापर फोडून हात वर केले आहेत. गुन्हे शाखेने या पीआर कंपन्यांचीही चौकशी सुरू केलीय. त्यामुळे सारेच धास्तावले आहेत. काही सेलिब्रेटींनी चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी स्वत:हून पुढे येत आपल्या नावाने सुरू असलेल्या बनावट सोशल मीडिया अकाऊंट, यूटय़ूब चॅनेलबाबत तक्रार केली आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात सिनेसृष्टी, राजकारण, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासह खेळाडूंची नावं उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या उत्साहाने गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या हिमनगाचं टोक उघड केलं त्याच उत्साहाने ते मुळापर्यंत जाणार का, हे भविष्यात स्पष्ट होईलच. मात्र त्यामुळे प्रसिद्धीच्या चेहऱ्याआड दडून लोकांच्या प्रेमाचाही व्यवसाय करणारे खरे चेहरे उघडे पडले आहेत हेही तितके च खरे!