अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. भारत पाकिस्तान युद्द, जिहाद, दहशतवादी संघटना, धार्मिक दंगली यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजचे बरेच कौतुक झाले. एका मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यावर आधारित असलेली ही वेबसिरीजमध्ये मनोजने प्रेक्षकांसमोर ठेवलेली श्रीकांत तिवारी या भारतीय गुप्त वार्ता विभागात काम करणाऱ्या व्यक्तीच्या कथेने अनेकांना भूरळ पाडली. उत्कंठा टिकवून ठेवणारी ही वेब सिरीज अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली होती. या सिरीजच्या दुसऱ्या भागाची मनोजचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. असं असतानाच आता या वेबसिरिजच्या दुसऱ्या भाग कधी प्रदर्शित होणार, त्याची कथा काय असणार, कोणते कलाकार त्यामध्ये असणार यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त मनोरंजन क्षेत्राशी संबंधित वेबसाईट्सने दिले आहे.

कथा काय?

‘द फॅमिली मॅन’ ही श्रीकांत तिवारीचे दुहेरी आयुष्य दाखवणारी कथा आहे. एकीकडे श्रीकांत आपल्या कुटुंबासमोर सामान्य आयुष्य जगत असल्याचे दिसते तर दुसरीकडे तो भारतातील सर्वोत्कृष्ट गुप्तहेरांपैकी एक असून याबद्दल त्याच्या घरच्यांना काहीच कल्पना नसल्याचे दाखवण्यात आलं आहे.नॅशनल इंटॅलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही मालिका आहे. कथेचा शेवट अगदीच अधांतरी आणि लटकवून ठेवलेला असल्याचे पहिल्या सिझननंतर प्रेक्षकांनी म्हटलं होतं. मात्र पहिल्या सिझनमध्ये कथा जिथे संपली जिथूनच दुसऱ्या सिझनची कथा पुढे सुरु होणार आहे.

या प्रश्नांची उत्तरे मिळणार?

दिल्लीमध्ये गॅस लिक करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न यशस्वी होतो का या आधारावरच पुढील कथानक आधारलेले आहे. दहशतवाद्यांचा डाव यशस्वी होतो का?, श्रीकांत दिल्लीला कसा वाचवतो?, श्रीकांत आणि त्याची पत्नी सुचित्रा (प्रियमणी) यांच्यामधील नातेसंबंधांचे पुढे काय होते?, त्या रात्री सुचित्रा आणि अरविंद (शरद केळकर) यांच्यामध्ये नक्की काय झाले?, मिशन जुल्फीकारचे काय होते?, करिमची प्रेयसी श्रीकांतचा तो व्हिडिओ जगासमोर आणते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या सिरीजमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत.

कलाकार कोण?

पहिल्या सिझनप्रमाणेच मनोज वाजपेयी श्रीकांतच्या भूमिकेत असेल. त्याची पत्नी म्हणजेच सुचित्रा तिवारीच्या भूमिकेत प्रियमणी दिसणार आहे. श्रीकांतच्या मित्राच्या म्हणजेच जे. के तळपदेच्या भूमिकेत शारीब हाश्मी दिसेल तर शरद केळकर अरविंदची भूमिका साकारताना दिसणार आहे. दर्शन कुमार मेजर समीर म्हणून तर दिलीप थाली कुलर्णीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहाब अली साजीदची भूमिका साकारणार आहे तर सनी हिंदुजा, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, श्रेया धन्वंतरी हे कलाकार देखील या मालिकेत झळकणार आहेत.

नवा चेहरा

सर्वाधिक चर्चेत असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी ‘द फॅमेली मॅन’च्या दुसऱ्या पर्वामधून वेब विश्वात पदार्पण करणार आहे. त्यामुळे या सिझनमध्ये एक नवी भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

किती भाग असतील?

पहिल्या पर्वाप्रमाणेच ‘द फॅमिली मॅन २’चे ही दहा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रत्येक भाग हा ४५ ते ६० मिनिटांच्या दरम्यान असेल.

कधी प्रदर्शित होणार?

‘द फॅमिली मॅन २’ याच वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र नक्की किती तारखेला हा सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यासंदर्भात खुलासा करण्यात आलेला नाही. या सिरिजचा पहिला भाग २० सप्‍टेंबर २०१९ ला प्रदर्शित झाला होता.