जस्टिन बिबरने आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर संपूर्ण जगाला वेड लावले आहे. जस्टिनचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी इतके उत्सुक असतात की वेळप्रसंगी सुरक्षारक्षकांशीही मारामारी करायला ते मागेपुढे पाहात नाहीत. परंतु एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने चक्क जस्टिनवरच हल्ला केल्याच्या घटनेने सगळ्यांनाच गोंधळात टाकले आहे. जस्टिनच्या भारतात झालेल्या संगीत सोहळ्यात त्याने लिपसिंक करून प्रेक्षकांची फसवणूक केली होती. याचीच पुनरावृत्ती त्याने स्टॉकहोम येथील म्युझिक कॉन्सर्टमध्येही केली. पहिल्या रांगेतील प्रेक्षकांना हे लक्षात येताच त्यांनी ‘बेबी बेबी’ या गाण्याची मागणी केली.
परंतु सर्व गाणी रेकॉर्डेड असल्यामुळे त्यांचा क्रम आधीच ठरलेला होता. जस्टिनने केलेली फसवणूक लक्षात येताच नाराज प्रेक्षकांनी त्याला शिव्या घालायला सुरुवात केली. त्यानेही मागेपुढे न पाहता थेट शिव्या घातल्या. परिणामी मागे वाजणारे गाणे आणि त्याच्या ओठांची हालचाल यात तफावत आहे हे सिद्ध झाले. प्रेक्षकांनी मिळून एकच दंगा केला. याच गोंधळाचा फायदा घेऊन सुरक्षारक्षकांची नजर चुकवून एका चाहत्याने बिअरची बॉटलच जस्टिनच्या दिशेने फेकली. आपल्या दिशेने येणारी बॉटल पाहताच तो खाली वाकला आणि थोडक्यात बचावला. या हल्लयानंतर कार्यक्रमच बंद पडला. आता प्रेक्षक आयोजकांकडून तिकिटांचे पैसे परत मागत आहेत. गेल्या दोन वर्षांत लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान जस्टिनवर झालेला हा पाचवा हल्ला आहे. मात्र तो अजूनही याकडे एक सामान्य घटना म्हणून दुर्लक्ष करत आपल्या सुरस्टारच्या वलयात रमला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 3:17 am