कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने तिला मिळालेल्या एका व्हॉट्स अॅप मेसेजविषयी राग व्यक्त केला. फराहला चित्रपट स्क्रिनिंगसाठीचे निमंत्रण एका व्यक्तीने व्हॉट्स अॅप मेसेजद्वारे पाठवले होते. ट्विटर अकाऊंटवरून तिने याचा संताप व्यक्त केल्याने ती व्यक्ती कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला. त्या व्यक्तीवर तिने असभ्य माणूस अशी टीकाही केली होती. फराहला मेसेज पाठवणारा तो दुसरा तिसरा कोणी नसून कॉमेडीयन कपिल शर्माच आहे. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार कपिलला उद्देशूनच फराहने तो ट्विट केला होता.

‘प्रिमिअर, प्रिव्ह्यू किंवा पार्टीचे निमंत्रण मला सामान्यांप्रमाणे व्हॉट्स अॅप मेसेजवर पाठवू नका. तुम्ही माझ्यावर उपकार करत नाही आहात. कमीत कमी तुम्ही कॉल तरी करू शकता. तेवढ्यासाठीही जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमच्या स्क्रिनिंगला यायला माझ्याकडे वेळ असेल असे तुम्हाला वाटते का?,’ असे ट्विट तिने केले होते.

वाचा : कास्टिंग काऊचबद्दल सलमान म्हणतो..

हे ट्विट कोणाला उद्देशून होते असे तिला विचारले असता ती म्हणाली की, ‘फक्त कपिल शर्माच नाही तर इतरही काही कार्यक्रम त्याच दिवशी आयोजित केले होते. त्या सर्वांना उद्देशून तो ट्विट केला होता.’ कपिल आणि फराहमध्ये मैत्रीपूर्ण नाते होते. मात्र, मेसेजच्या या प्रकरणानंतर या दोघांमध्ये कटूता निर्माण झाली आहे यात काही शंका नाही. कपिलने बऱ्याच कलाकारांना अशाच प्रकारे निमंत्रण पाठवल्याने ‘फिरंगी’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला फार कमी जण उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे.