मराठी सिनेसृष्टीत नाना पाटेकर हे नाव जेवढं मोठं आहे तेवढंच मोठं नाव त्यांचं बॉलिवूडमध्येही आहे. नाना पहिल्यापासूनच त्यांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल फार गंभीर होते. त्यांच्या भूमिकेप्रती असणाऱ्या याच गांभीर्यामुळे एक प्रसिद्ध दिग्दर्शक नेहमीच त्यांना घाबरुन असते. त्या दिग्दर्शिकेचं नाव आहे फराह खान.

अनेक दिग्दर्शकांना पाटेकर यांच्यासोबत एकदा तरी काम करण्याची इच्छा असते. पण त्यांचे व्यक्तिमत्व आणि कलाविश्वात असणारा वावर पाहूनच अनेकजणांना त्यांची भीती वाटते. फराहनेही अशाच परिस्थितीचा सामना केला ज्यामुळे तिने कधीच नानांसमोर कोणत्या भूमिकेचा प्रस्ताव ठेवला नाही.

कोरिओग्राफर, दिग्दर्शक म्हणून नावारुपास आलेली फराह खान नाना पाटेकरांना एवढी घाबरली होती की इच्छा असूनही तिने आपल्या सिनेमात काम करण्यासाठी नानांकडे विचारणा केली नव्हती. तिने असे का केले, असा प्रश्न विचारला असता फराहने एक गोष्ट सर्वांसमोर उघड केली. ‘पत्रिका’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, फराहला ‘मैं हू ना’ या सिनेमात खलनायकी भूमिकेसाठी नाना यांची निवड करायची होती. पण, त्यांच्या प्रती असणारी आदरयुक्त भीती पाहता तिने नानांसमोर या भूमिकेचा प्रस्ताव ठेवलाच नाही आणि यामुळेच तिने या भूमिकेसाठी सुनिल शेट्टीची निवड केली.

लवकरच नाना पाटेकरांचा सतीश राजवाडे दिग्दर्शक ‘आपला मानूस’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. मुसळधार पावसात नाना बाईक चालवताना पोस्टरमध्ये दिसत आहेत. त्यांची भेदक नजर यामध्ये विशेष लक्ष वेधून घेते. त्यासोबतच पोस्टरवरील ‘हा सैतान बाटलीत मावनात नाय’ ही टॅगलाइन नानांच्या भूमिकेविषयी उत्सुकता वाढवत आहे. नवऱ्याच्या वडिलांसोबत राहणाऱ्या, शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या आणि नातेसंबंधांची गुंतागुंत हाताळणाऱ्या एका तरुण दाम्पत्याची कथा या सिनेमातून मांडण्यात आली आहे.