23 July 2018

News Flash

Yuvraj and Hazel Keech Wedding: फराहच्या इशा-यावर नाचणार युवी-हेजल

या लग्नसोहळ्यातील संगीत सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. बाली येथे गुपचूप साखरपुडा करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारे हे प्रेमीयुगुल ब-याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाची तयारी करत आहेत. अगदी दोन दिवसांवर या दोघांचे लग्न येऊन ठपले असून ३० नोव्हेंबरला हे विवाहबद्ध होतील. युवराज येत्या १२ डिसेंबरला ३५ वर्षांचा होईल. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाआधीच त्यांचे लग्न व्हावे अशी युवराजची आई शबनम सिंग यांची इच्छा होती. हा विवाहसोहळा चंदीगढ येथे पार पडेल. युवराजचे वडील योगीराज सिंग यांनी एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत संगीत आणि मेहंदी सोहळा एकाच दिवशी होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गुरुद्वारामध्ये लग्नाच्या विधी होतील. यावेळी केवळ जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित राहतील.

दरम्यान, या लग्नसोहळ्यातील संगीत सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या सोहळ्याची कोरिओग्राफी फराह खान करणार आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक असलेल्या फराहने युवराज लग्न करेल तेव्हा त्याच्या संगीत सोहळ्याची धुरा तिच सांभाळणार असा शब्द दिला होता. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फराह म्हणाली की, युवराजची आणि माझी खूप जुनी मैत्री असल्यामुळे त्याचा संगीत सोहळा हा माझ्या व्यवसायाचा भाग नाही. तो मला बहिण मानतो. त्यामुळे माझ्याकडून ही त्याच्यासाठी भेट असेल.

युवराजने काही दिवसांपूर्वीच त्याची भावी पत्नी हेजल हिच्यासह लग्नाआधी एका डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या दोघांच्या लग्नपत्रिकेवर कार्टून आणि इलस्ट्रेशनचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यांच्या लग्नाची थीमही हटके असून त्यास ‘युवराज-हेजल प्रीमियर लीग’ असे नाव देण्यात आले आहे. युवराजने कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या प्रेम कहाणीबद्दल सांगितले होते. हेजलने मला तीन वर्ष वाट पाहायला लावली. ७-८ वेळा तर ती कॉफीसाठी येते म्हणाली आणि आलीच नाही. त्यानंतर तिने मला होकार दिला, असे युवीने सांगितलेले. साडे चार वर्ष एकमेकांची आवडनिवड जाणून घेतल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on November 28, 2016 6:03 pm

Web Title: farah khan keeps her word turns choreographer for yuvraj singh hazel keech sangeet ceremony