लैंगिक छळाच्या आरोपांमुळे ‘हाऊसफुल ४’च्या दिग्दर्शक पदावरुन साजिद खान पायउतार झाल्यानंतर त्याची जागा फरहाद सामजी घेणार आहे. फरहाद सामजीने हाऊसफुल ३ चे दिग्दर्शन केले होते. नादीयावाला ग्रँडसन एंटरटेनमेन्टकडून शनिवारी ही घोषणा करण्यात आली.

#MeToo मोहिमेतंर्गत अनेक महिलांनी पुढे येऊन साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता अक्षय कुमारनं साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिला.

साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण तातडीनं रद्द करण्यात यावं अशी मागणी अक्षयनं ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली होती. साजिदनं सारी नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुलच्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला.

‘बंगाली मुली हॉट असतात’, साजिदच्या वर्तनाची नवी पोलखोल
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या रेंसिल डी’सिल्वा दिग्दर्शित ‘उंगली’ या चित्रपटातील अभिनेत्री रॅचेल व्हाइटने साजिद खानवर गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. साजिदने मला फोन करुन अश्लील वक्तव्य केल्याचं रॅचेलने म्हटलं आहे. ‘साजिद खानचं बॉलिवूडमध्ये मोठं नाव असेल. मात्र प्रत्यक्षात तो एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. साजिदने माझ्यासोबत जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला मला वाच्या फोडायची होती. परंतु माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. जेव्हा सलोनी चोप्राने तिच्यावर झालेल्या अन्यायचं कथन केलं तेव्हा हीच खरी वेळ असल्याचं समजून मी झालेले अन्यायला ट्विटरच्या माध्यमातून वाच्या फोडण्याचा निर्णय घेतला. ‘हॅलो बंगाल टाइग्रेस ! तुम्ही बंगाली मुली फार मादक असता’, असं साजिद यांचं पहिलं वाक्य होतं. त्यानंतरही त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये अश्लील शब्दांचा भरणा होत होता’, असं रॅचेल म्हणाली