अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयानं दोषी ठरवत स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरू आसारामला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसाराम बापूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही जणांनी आसाराम सोबत मोदींचे असलेले काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून बॉलिवूड अभिनेता फरान अख्तर यांनी आपल्या चाहत्यांना आसारामसोबत मोदींचे फोटो शेअर न करण्याची विनंती केली आहे.

‘आसाराम हा बलात्कारी आहे, याबद्दल त्याला शिक्षा सुनावली हे चांगलंच झालं. पण आता लोकांनी त्याच्यासोबत असलेले पंतप्रधान मोदींचे फोटो शेअर करणं थांबवलं पाहिजे. आसारामवर आरोप होण्याआधीचे हे फोटो असावे. त्यामुळे आपल्यासारखं त्यांनादेखील काहीच माहिती नसावं असं आपण समजून चालूयात’ असं ट्विट करत फराननं मोदींना ट्रोल न करण्याची विनंती केली आहे. आसारामला शिक्षा झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यासोबत असलेले मोदींचे फोटो व्हायरल झाले होते. यात सत्संगचाही व्हिडिओ होता. ‘मला जेव्हा कोणीच ओळखत नव्हतं तेव्हापासून आसाराम बापूचा आशीर्वाद मला मिळत आहे. मी बापूंना प्रणाम करतो. ते मला शक्ती देतात. ‘ असं मोदी या व्हिडिओत बोलत होते.

पण, हे फोटो शेअर करून मोदींवर टीका करणं चुकीचं आहे असं प्रांजळ मत त्यानं मांडलं आहे. मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. या खटल्याची सुनावणी १९ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी ती एस.सी.-एस.टी. प्रकरणांच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती. या खटल्यातील अंतिम युक्तिवाद ७ एप्रिलला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल २५ एप्रिलला जाहीर करण्यासाठी राखून ठेवला होता. जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत ७७ वर्षे असलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.