गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला गुलाबो सिताबो हा चित्रपट आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी आणि आयुषमान यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. विशेष म्हणजे या दोघांव्यतिरिक्त चित्रपटातील आणखी एक पात्र सध्या सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे.

‘गुलाबो सिताबो’मध्ये आयुषमान आणि बिग बी यांच्यासह अन्य काही कलाकारांनीही स्क्रीन शेअर केली आहे. यात मिर्झा म्हणजेच बिग बींच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या बेगमने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही भूमिका अभिनेत्री फारुख जफर यांनी वठविली आहे.

शूजित सरकार दिग्दर्शिक ‘गुलाबो सिताबो’मध्ये झळकलेल्या फारुख जफर या ८७ वर्षांच्या असून त्यांचा कलाविश्वावातील वावर वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फारुख जफर यांनी १९८१ साली उमराव जान या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी अमीरन म्हणजेच उमराव जानच्या आईची भूमिका साकारली होती. तर रेखा यांनी उमराव जान ही भूमिका वठविली होती.

कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी फारुख या रेडिओ उद्घोषक होत्या. त्यांनी १९६३ साली लखनौमध्ये विविध भारतीमध्ये उद्घोषक म्हणून काम केलं होतं. मात्र स्वदेश या चित्रपटात काम केल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या.

फारुख यांनी तब्बल २३ वर्षानंतर स्वदेश या चित्रपटातून कलाविश्वात कमबॅक केलं. त्यानंतर त्या पीपली लाइव्ह, पार्चड, सुलतान, सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे त्यांनी बॉलिवूडच्या तीनही खानसोबत काम केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं आहे.