28 September 2020

News Flash

‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ चित्रपटाची १०० कोटींची कमाई

गेल्या काही वर्षांत हॉलीवूडपटांना भारतात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो आहे. भारतीय प्रेक्षकांना असलेले हॉलीवूडपटांचे आकर्षण लक्षात घेऊन भारतात पहिल्यांदा आपला चित्रपट प्रदर्शित करण्यापासून ते इथल्या

| April 12, 2015 12:29 pm

गेल्या काही वर्षांत हॉलीवूडपटांना भारतात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो आहे. भारतीय प्रेक्षकांना असलेले हॉलीवूडपटांचे आकर्षण लक्षात घेऊन भारतात पहिल्यांदा आपला चित्रपट प्रदर्शित करण्यापासून ते इथल्या नावाजलेल्या कलाकारांना आपल्या चित्रपटांमध्ये भूमिका देण्यापर्यंत अनेकविध प्रयत्न हॉलीवूड निर्मात्यांनी केले आहेत. परिणामस्वरूपी हॉलीवूडपटांना सातत्याने इथे तिकीटबारीवर चांगली कमाई करता आली आहे. जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘द अमेझिंग स्पायडर मॅन’, ‘आयर्नमॅन’, ‘ट्रान्सफॉर्मर’सारख्या चित्रपटांनी ४० ते ८० कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. मात्र, गाडय़ा आणि रेसिंग यांच्यामुळे नावाजलेल्या ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ या हॉलीवूडपटाने आठवडय़ाभरात १०० कोटी रुपयांची कमाई करून बॉलीवूडलाही धक्का दिला आहे.
‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ देशभरातील २८०० चित्रपटगृहांमधून प्रदर्शित करण्यात आला होता. इतक्या मोठय़ा प्रमाणावर इथे प्रदर्शित केलेला हा पहिलाच हॉलीवूडपट असून या चित्रपटाने आठवडय़ाभरात १०० कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. हॉलीवूडपटांना आपल्याकडच्या मेट्रो शहरांमधूनच नाही तर इतर छोटय़ा शहरांमधूनही तितकीच मागणी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे,’ असे ‘युनिव्हर्सल पिक्चर्स’चे महाव्यवस्थापक सरबजित सिंग यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. ‘फास्ट अँड फ्युरिअस’ सिक्वलपटांचे आपल्याकडे अनेक चाहते आहेत. शिवाय, या चित्रपटाचा नायक अभिनेता पॉल वॉकर याचे अपघाती निधन, त्यानंतर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पॉल वॉकरची प्रतिमा उभी करत पूर्ण केलेला चित्रपट यामुळे ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’बद्दल अनेकांना उत्सुकता होती.
गेली दोन वर्षे चर्चेत असलेला हा हॉलीवूडपट इथे गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. टुडी, थ्रीडी आणि आयमॅक्स अशा तीन फॉरमॅटमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच सर्वाधिक कमाई केली होती. पॉल वॉकर, व्हिन डिझेल, जेसन स्टॅथम या ‘फास्ट अँड फ्युरिअस’च्या टीमबरोबर हिंदी चित्रपट अभिनेता अली फझलचीही या चित्रपटात छोटेखानी भूमिका आहे. याआधी, ‘अवतार’ने भारतात १४५ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘अमेझिंग स्पायडरमॅन’ या चित्रपटाने ८७.७ कोटी रुपये तर अँग लीच्या ‘लाइफ ऑफ पाय’ने ८०.३ कोटींची कमाई केली होती. ‘कॅप्टन अमेरिका’, ‘आयर्न मॅन’, ‘ग्रॅव्हिटी’, ‘इन्टरस्टेलर’सारख्या वेगवेगळ्या हॉलीवूडपटांना इथे चांगली कमाई करता आली आहे. मात्र, सात दिवसांत शंभर कोटी रुपयांचा आकडा वेगाने पार करणारा ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ हा पहिला हॉलीवूडपट ठरला आहे. या चित्रपटाच्या यशामुळे सुखावलेल्या ‘युनिव्हर्सल पिक्चर्स’चा ‘ज्युरासिक वर्ल्ड’ हा ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपट मालिकेतील नवा चित्रपट भारतात जूनमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘ज्युरासिक वर्ल्ड’ या हॉलीवूडपटात अभिनेता इरफान खानही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 12:29 pm

Web Title: fast and furious 7 first rs 100 cr hollywood film in india
Next Stories
1 चाळकरी शाहरुख
2 रूपेरी पडद्यावर कतरिना कैफ-सिद्धार्थ मल्होत्राची जोडी
3 ‘कार्टी’च्या साथीने प्रशांत दामले पुन्हा रंगभूमीवर
Just Now!
X