‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री फातिमा सना शेखने इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. #MeToo मोहिमेवर तुझं काय मत आहे असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर माझ्यासोबतही असा प्रकार घडला असून त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही असं ती म्हणाली.

‘माझ्या आयुष्याशी निगडीत त्या गोष्टी मला सार्वजनिकरित्या सांगायची इच्छा नाही. मी स्वत: त्या गोष्टींतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय. लैंगिक शोषण ही गोष्ट आज इतकी सामान्य झाली आहे की महिलांनी त्याला आपल्या जीवनाचा एक भाग म्हणूनच स्वीकार केला आहे. मी ज्या गोष्टींना सामारं गेले, जे निर्णय घेतले त्यावरून कोणी माझ्याबद्दल मत तयार करावं असं मला वाटत नाही. माझ्या जवळच्या व्यक्तींना मी त्याबाबत सांगितले आहे,’ असं ती म्हणाली.

फातिमाने बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या मीटू मोहिमेची प्रशंसा केली. ‘या मोहिमेमुळे समाजात लैंगिक शोषणाबद्दल मोकळेपणाने बोललं जात आहे. या मोहिमेमुळे शोषण करणाऱ्या लोकांची नावं समोर आली. त्यामुळे सार्वजनिकरित्या आपलं नाव खराब होऊ नये अशी भीती त्यांना वाटू लागली आहे,’ असं ती पुढे म्हणाली.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटकेर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत इंडस्ट्रीतील मोठी नावं समोर आली. आलोक नाथ, कैलाश खेर, साजिद खान, सुभाष घई यांसारख्या बड्या कलाकारांवर आरोप झाले.