‘दंगल’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिने वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनेत्री म्हणून तिला कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं आणि इंडस्ट्रीत तिला कोणता अनुभव आला याबद्दल सांगितलं.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “तुला इंडस्ट्रीत फक्त सेक्सच्या बदल्यात काम मिळेल असं अनेकांनी मला सांगितलं. अनेकदा मी माझी नोकरी गमावली आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर प्रत्येक इंडस्ट्रीत स्त्री-पुरुष भेदभाव होतो. मी जेव्हा तीन वर्षांची होते, तेव्हा माझा विनयभंग झाला होता. त्यामुळे ही समस्या ती खोलवर आहे हे तुम्ही समजू शकता. प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो. प्रत्येक स्त्री, प्रत्येक अल्पसंख्याक दररोज संघर्ष करतोय.”

आणखी वाचा : आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

फातिमाला इंडस्ट्रीत अनेकदा तिच्या लूकवरून नाकारण्यात आलं. याविषयी तिने पुढे सांगितलं, “तू कधीच हिरोइन बनू शकत नाही, असं मला अनेकांनी सांगितलं होतं. तू दीपिका, ऐश्वर्या यांच्यासारखी दिसत नाहीस, तर तू हिरोइन कशी होशील? असं मला सुनावण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी सौंदर्याची परिभाषा तशी होती. पण मी या चौकटीत बसत नाही. पण आता माझ्यासारख्या मुलींना संधी मिळतेय.”

‘दंगल’ या चित्रपटात फातिमाने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रचंड वाहवा झाली. फातिमा ‘ल्युडो’ आणि ‘सुरज पे मंगल भारी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.