बॉलिवूडमध्ये एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणं ही गोष्ट आता काही नवी राहिलेली नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी दोन चित्रपटांची टक्कर होऊ नये यासाठी अनेक चित्रपट दिग्दर्शक, निर्माते समन्वयाने आपल्या चित्रपटांच्या तारखांमध्ये बदल करतात. तसाच काहीसा प्रकार आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होऊ लागला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘गर्ल्स’ हे दोन मोठे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट१५ नोव्हेंबर रोजी म्हणजे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. मात्र एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची टक्कर होऊन दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी ‘गर्ल्स’चे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा ‘गर्ल्स’ हा चित्रपट आता २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शिक ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“हे दोन्ही चित्रपट वेगळ्या धाटणीचे आहेत आणि या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा, असे आम्हाला वाटते. ‘गर्ल्स’ हा एक निखळ मनोरंजनात्मक चित्रपट आहे. तर ‘फत्तेशिकस्त’ हा ऐतिहासिक चित्रपट आहे. दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत, मुद्दे वेगळे आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याव्यतिरिक्त चित्रपटसृष्टी ही एका परिवारासारखी आहे. त्यामुळे या निर्णयाचा दोन्ही चित्रपटांना निश्चितच फायदा होईल”, असं ‘गर्ल्स’ चित्रपटाचे निर्माते नरेन कुमार म्हणाले.

दरम्यान, ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’ या चित्रपटाचा पुढील भाग आहे.’फत्तेशिकस्त’मध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अनुप सोनी आणि इतर अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. तर ‘गर्ल्स’ या चित्रपटातील कलाकार अद्याप गुलदस्त्यातच आहेत.