शिवजयंतीचं निमित्त साधत लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शेर शिवराज है’ या सिनेमाची घोषणा केली होती. यातच त्यांचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
2020 सालात घोषणा करण्यात आलेला ‘जंगजौहर’ हा सिनेमा रिलीज होतोय. मात्र या सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला आहे. ‘पावनखिंड’ असं या सिनेमाचं नाव बदलण्यात आलं असून 10 जूनला सिनेमा रिलीज होणार आहे. पन्हाळगडाच्या घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या जीवाशी खेळत सिद्दी जौहरच्या सैन्याशी दोन हात केले. महाराजांचं स्वराजाचं स्वप्न साकारणाऱ्यासाठी बाजीप्रभूनी प्राण त्यागले. याच अजरामर अशा घोडखिंडीला शिवरायांनी पावनखिंड असं नाव दिलं.
View this post on Instagram
बाजीप्रभूंच्या या बलिदानाची गाथा या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली खिंड म्हणून या खिंडीला पावनखिंड असं नाव देण्यात आलं. अंगावर रोमांच उभी करणारी पन्हाळगडाच्या खिंडीतील ही लढाई अवघ्या महाराष्ट्राला ‘पावनखिंड’ची लढाई म्हणून ज्ञात आहे. त्यामुळेच या सिनेमाला ‘जंगजौहर’ हे नाव न देता ‘पावनखिंड’ हे नाव देण्यात आलंय.
या सिनेमातून अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा शिव छत्रपतींच्या भूमिकेत झळकणार आहे. याआधी चिन्मय मांडलेकरने ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ‘शिवराज अष्टक’ या आठ सिनेमाच्या मालिकेतून शिवाजी महाराजांची वेगवेगळी रुपं आणि स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना दाखवायचा आहे. यातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ या दोन सिनेमांना प्रेक्षकांनी मोठी पसंती दिलीय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 27, 2021 6:38 pm