तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असणारा गेम PUBG वर भारतात बंदी आणली. त्यानंतर या गेमला टक्कर देणारा दुसरा भारतीय गेम FAU-G ची घोषणा झाली. FAU-G (Fearless and United- Guards) या गेमची संकल्पना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची होती अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. यावर आता गेम डेव्हलप करणाऱ्या कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.

“FAU-G या गेमची संकल्पना सुशांत सिंह राजपूतची होती, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र ही चर्चा पूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे. विशाल गोंदल आणि दयानिधी एमजी यांनी nCore या कंपनीची स्थापना २०१९ मध्ये केली. २५ हून अधिक प्रोग्रॅमर्स, डिझायनर्स, टेस्टर्स, आर्टिस्ट यांनी मिळून FAU-G हा गेम बनवला आहे”, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.

FAU-G या गेमसाठी जो फोटो वापरण्यात आला आहे त्यावरही चोरीचा आरोप झाला. याबद्दलही कंपनीने स्पष्टीकरण दिलं. शटरस्टॉककडून अधिकृतपणे लायसन्स विकत घेऊन तो फोटो वापरल्याचं कंपनीने सांगितलं. FAU-G या गेमचा टीझर पोस्टर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने प्रदर्शित केला. लवकरच हा गेम लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा २०% निधी हा जवानांना देण्यात येणार आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देत FAU-G हा गेम सादर करताना अभिमान वाटत आहे. करमणुकीव्यतिरिक्त, हा गेम खेळताना खेळाडू आपल्या सैनिकांच्या संघर्षाविषयी जाणून घेतील. या गेममधून मिळाणाऱ्या पैशांपैकी २०% निधी जवानांना देण्यात येणार आहे’ असे अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटले आहे.