पंकज भोसले

चित्रपटांमधील भयकथांमध्ये विज्ञान डोकावते तेव्हा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच शक्यता पडद्यावर दिसू शकतात. त्यातील पहिली शक्यता अधिक वेळा वापरण्यात आलेली आणि चटकन आठवणारी म्हणजे परग्रहवासीयांची असते. तबकडय़ांसह समूहाने किंवा एकटय़ाने येणारे परग्रहवासीय पृथ्वीवरील मानवसृष्टीला नामोहरम करण्याच्या उद्योगाला कधी उघडपणे राबविताना दिसतात (इण्डिपेण्डन्स डे, मेन इन ब्लॅक) तर कधी छुप्या पद्धतीने मानवताराचा आधार घेताना पाहायला मिळते (द फॉकल्टी). टर्मिनेटर, प्रीडेटरसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना पाहिले, तर या चित्रप्रकारात भयमात्रा परग्रहवासीयांच्या अकल्पित ताकदीनुसार ठरलेली जाणवते. दुसरी शक्यता असते शास्त्रज्ञांच्या चुकीमुळे घडणाऱ्या अनर्थाची. ‘फ्लाय’ या चित्रपटामध्ये एका संशोधकाच्या प्रयोगाच्या अंतिम टप्प्यात माशी शिंकतच नाही, तर अनवधानाने प्रयोगयंत्रात सहभागीदेखील होते. अन् त्यामुळे इथला विज्ञान प्रयोग कथानकाला एका भयप्रद वाटेवर आणून सोडतो. ‘स्प्लाइस’ चित्रपटामध्ये संशोधक जोडपे मानवी गुणसूत्रांचे संमीलन भलत्याच प्राण्यासोबत घडवून प्रयोगशाळेत एक पशुमानव जन्माला घालते.  निसर्गप्रवाहाच्या विरुद्ध जाणारा हा प्रयोग यशस्वीही होतो. मात्र ते यश या भयपटात अल्पकालीन ठरते. तिसरी शक्यता असते ती मानवाने पर्यावरणाशी घेतलेल्या शत्रुत्वामुळे तयार होणाऱ्या भस्मासुरी शक्तींची. कारखान्यांतील रसायने, विषारी वायू सोडल्यामुळे मिश्रणांतून तयार होणाऱ्या राक्षसांचे चित्रपट (द होस्ट) अंगावर काही काळ काटा आणण्याची क्षमता राखून ठेवतात.

आता इतक्या थोडय़ा शक्यतांपलीकडे कल्पनाभरारीचे अधिक मार्ग नसल्याने याच चौकटींत अगदी नवा, अनोळखी कथानक वाटेल, असा सिनेमा बनविणे भयचित्रपटकर्त्यांपुढे आव्हान असते. ब्रिटिश लेखक-दिग्दर्शक कार्ल स्ट्रेथी यांनी घडविलेला ‘डार्क एन्काउण्टर’ हा चित्रपट या आव्हानांना पुरून उरतो. भयविज्ञान चित्रपट पाहून सरावलेल्यांनाही येथील क्लृप्त्या चकवू शकतात. रहस्यरंजनाचा पुरेपूर दारूगोळा सोबत असलेला ‘डार्क एन्काउण्टर’ प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरणारा आहे.

हा सिनेमा सुरू होतो, तो १९८२ साली अमेरिकेतील एका खेडय़ातील घरातून आठ वर्षांच्या मुलीच्या गायब होण्यापासून. दोनेक तासांसाठी बाजारहाट करायला गेलेले आई-वडील घरी येतात, तेव्हा घरातील साऱ्या गोष्टी जागच्या जागी असतात. मात्र आपली मुलगी कुठेच नसल्याचे त्यांना उमजते. मुलीचे अपहरण झाल्याच्या किंवा तिने स्वत:हून घर सोडून निघून जाण्याच्या कोणत्याही खुणा सापडत नाहीत. साऱ्या प्रकारे शोधाशोध घेऊनदेखील बेपत्ता मुलीचा मागमूस लागत नाही. चित्रपट या घटनेच्या बरोबर वर्षांनंतर पुन्हा या घरात जमलेल्या नातेवाईकांच्या गप्पांमध्ये शिरतो. लहान मुलीच्या बेपत्ता होण्याची घटना स्थानिक वृत्तमाध्यमांपासून आसपासच्या गावांत सर्वाधिक चर्चा-चघळ गोष्ट बनलेली असते. अन् घरामध्ये त्याचे पडसाद उमटत राहतात. बेपत्ता मुलीची आई ऑलिव्हिआ (लॉरा फ्रेझर) आणि वडील रे (मेल रेडो) दोघेही प्रचंड बिथरलेले असतात. नातेवाईकांच्या सांत्वनेतूनही त्यांच्या मनातील खदखद आणि दु:ख बदलू शकत नाही.  मुलगी हरविल्याच्या दु:खद घटनेला वर्ष झाल्यानिमित्ताने सारे नातेवाईक एकमेकांना मानसिक आधार देण्यासाठी जमण्याच्या दिवशीच घर आणि घराभोवती विचित्र घटनांची मालिका सुरू होते. रे याला आकाशातून विविधरंगी दिवेसदृश वस्तू वेगातून सरकताना दिसतात. गावातील उपद्रवी व्यक्ती घराजवळच्या जंगलात शिरल्याचा अंदाज करीत रे नातेवाईकांसह तेथे पोहोचतो. तेथे उपद्रवी व्यक्तींऐवजी काहीतरी अमानवी आणि अतक्र्य असल्याची खात्री त्यातल्या प्रत्येकाला होते. अन् ही जाणीव होण्याच्या आधीच त्यांच्यातील एक व्यक्ती बेपत्ता होते. रे घरी परल्यानंतर अनेक भयावह घटना एकामागोमाग एक घडू लागतात. घराभोवती शक्तिमान आणि अतिप्रखर प्रकाश पडू लागतो.  हरविलेल्या मुलीच्या खोलीतील खेळण्यांमध्ये अचानक प्राण शिरल्यासारखे वाटू लागते. भानामतीच्या वरताण धातूच्या वस्तू गुरुत्वाकर्षणाचे नियम धुडकावण्यास सुरुवात करतात. आत्मा-पिशाच्च या सगळ्या गोष्टी घडवीत असल्याची जाणीव साऱ्या व्यक्तिरेखांना व्हायला लागते. कुठलीतरी अजब शक्ती दारावर उभी असून घरात जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सारे शस्त्रसज्ज होतात. तरीही थोडय़ा वेळानंतर घरात शिल्लक राहिलेल्या व्यक्तींमधून एकेक व्यक्ती गायब होण्याचे सत्र सुरूच राहते.

कार्ल स्ट्रेथी यांचा डार्क एन्काउण्टर नावाबरहुकूम परग्रहवासीयांचा मानवी जीवनात नेहमीसारखा हस्तक्षेप दर्शविणारा असला, तरी यातील भयक्लृप्त्या, गडद संगीत, टोकाचा रहस्यताण प्रेक्षकाला अद्भुत अशा पातळीवर नेऊन सोडतात. या साऱ्या ब्रह्मांडात देवही नाही, अन् दानवही नाही अशीची भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये मुलीच्या बेपत्ता होण्यातील रहस्य उलगडा सर्वात महत्त्वाचा वळणटप्पा आहे. अन् त्यासाठी वापरलेली दिग्दर्शकाची कारागिरी ही सर्वोत्तम म्हणावी लागेल. आकाशात वेगाने तरंगणारे गूढ दिवे आणि समोर न येणारी अमानवी शक्ती यांच्यासाठी वापरलेली दृश्यकारागिरी लक्षात राहील अशी आहे. रहस्याद्वारे अखंड तणाव निर्माण करीत खिळवून ठेवण्याची ताकद असलेला हा अलीकडच्या काळातील चांगला भयविज्ञानपट म्हणावा लागेल.