बॉलिवूड अभिनेता रंजन सहगल याचं निधन झालं आहे. तो केवळ ३६ वर्षांचा होता. कार्डिअ‍ॅक अरेस्टचा झटका आल्यामुळे रंजनला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान मल्टिपल ऑरगन फेल्युअरमुळे त्याचं निधन झालं.

रंजन गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याला श्वसनाचा त्रास होत होता. तो मुंबईत एकटाच राहात होता. परिणामी उपचारासाठी तो आपल्या गावी जीरकपुर (पंजाब) येथे गेला. दरम्यान त्याची तब्येत आणखी बिघडल्यामुळे अधिक चांगल्या उपचारासाठी त्याला चंदीगढ येथे नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. रंजनची करोना चाचणी देखील करण्यात आली होती परंतु त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

रंजन छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता होता. ‘गुस्ताख दिल’ या मालिकेतून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘रिश्तों से बड़ी प्रथा’, ‘तुम देना साथ मेरा’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो झळकला होता. मालिकांसोबतच रंजनने काही बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. रणदीप हुड्डाच्या ‘सरबजित’ आणि शाहरुख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटामध्ये तो झळकला होता. शिवाय ‘यारा दा केचप’ आणि ‘माही एनआरआय’ या पंजाबी चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.