‘हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काळा पैसा नाही त्यामुळे ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्याचा चित्रपटसृष्टीवर काहीही परिणाम होत नाहीए’, असे जेष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी स्पष्ट केले आहे. ‘मला माझा मोबदला धनादेशाच्या स्वरुपात मिळतो. चित्रपटसृष्टीमध्येही रोख स्वरुपात पैशांची देवाणघेवाण केली जात नाही. ते दिवस गेले ज्या दिवसांमध्ये चित्रपट निर्माते एका सुटकेसमध्ये पैसे भरुन चित्रपटांचे व्यवहार करत असत. हल्लीच्या दिवसांमध्ये पैशांची देवाणघेवाण बँकेच्या माध्यमातून केली जाते. इतकेच नव्हे, तर माझ्या वाहन चालकालाही धनादेशाद्वारे पैसे दिले जातात’, असे ओम पुरी यांनी स्पष्ट केले.

यासोबतच ओम पुरी यांनी नरेंद्र मोदीनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचेही स्पष्ट केले. तसेच त्यांनी भविष्यात काहीतरी चांगले होण्याची इच्छा असेल तर थोडा त्रास सहन करावाच लागेल असे म्हणत मोदींजींच्या निर्णयाला पाठिंबाही दिला.

८ नोव्हेंबर २०१६ला रात्री १२ वाजल्यापासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. त्यानंतर याबद्दलचा एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रांवरही या निर्णयाचे परिणाम झाले आहेत. दरम्यान, मोदी सरकारचा हा मोठा निर्णय मानला जातो आहे. या निर्णयाचे अतिशय दूरगामी परिणाम होणार आहेत असेही म्हटले जातेय. काळा पैसा हा मोदी सरकारच्या अजेंड्यावरील विषय होता. आता देशातील काळ्या पैशाची सफाई करत मोदींनी एका वेगळ्या स्वच्छ भारत मोहिमेला सुरुवात केली आहे असेच अनेकांचे म्हणणे आहे.