10 August 2020

News Flash

‘फँड्री’ म्हणजे ‘टाईमपास’ नव्हे!

पौगंडावस्थेतील कोवळे प्रेम, स्वप्नाळूपणा आणि जातिभेदाच्या भिंतींची कटू जाणीवही समर्थपणे मांडणारा 'फँड्री' हा चित्रपट त्याच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेचा विषय होता.

| February 15, 2014 01:34 am

पौगंडावस्थेतील कोवळे प्रेम, स्वप्नाळूपणा आणि जातिभेदाच्या भिंतींची कटू जाणीवही समर्थपणे मांडणारा ‘फँड्री’ हा चित्रपट त्याच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेचा विषय होता. किशोर कदम सोडल्यास सर्व नवीन चेहरे आणि चित्रपटाला दिली गेलेली ट्रिटमेंट पाहता, हा चित्रपट काहीतरी वेगळंच रसायन आहे, हे त्याच्या प्रोमोजमधून जाणवत होतं. ‘फँड्री’ त्या अर्थाने प्रातिनिधिक स्वरूपाची कथा असली तरीही ती कुठल्याही समाजातील नाकारलेल्या प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीची कथा आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ हा चित्रपट कोवळ्या वयातील प्रेम आणि त्याला असलेली जातीव्यवस्थेतील दाहकतेची किनार पडद्यावर दाखवण्यात दोनशे टक्के यशस्वी ठरला आहे. एक चित्रपट म्हणून त्याच्यात जो काही मसाला आवश्यक आहे, तो असतानाच त्याच्या जोडीला तो माहितीपट न वाटता, सत्तर एमएम पडद्यावर सर्वांनी पहावा आणि पाहिल्यावर प्रत्येकाला अंतर्मुख करणारा हा चित्रपट आहे. काही चित्रपट हे फक्त संख्येत भर न घालता, चित्रपटाच्या परिभाषेला पुढे घेऊन जात असतात, ‘फॅंड्री’ हा त्यापैकीच एक.
‘फँड्री’ हे टायटल या चित्रपटाबद्दल आणि त्यातील आशयाबद्दल उत्सुकता निर्माण करते. ‘फँड्री’ या शब्दाचा अर्थ जरी सोपा असला तरीही हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावावा. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील संदर्भ बघून याचे स्वत:पुरते अनेक अर्थ प्रेक्षकांना काढता येतील.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात आजही जात हा विषय जाता जात नाही. पुस्तकं आणि चर्चांमध्ये कितीही आवेशाने जातीपातीच्या विरोधात बोलले जात असले तरी वास्तव हे आजही भयाण म्हणावे इतके स्पष्ट दिसून येते. ‘फॅंड्री’ हा चित्रपट पहिलं प्रेम आणइ केवळ मनोरंजनाच्याही पुढे जाऊन एका उपेक्षित समाजातील कुमार वयातील मुलाची एक तरल आणि संघर्षपूर्ण प्रेमकथा पडद्यावर मांडताना आजच्या समाजाचे भयाण वास्तव अधिक ठळकपणे दाखवतो.
सोमनाथ अवघडे, सूरज पवार, राजेश्वरी खरात, छाया कदम, प्रविण तरडे, किशोर कदम आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाने फॅंड्री सजला आहे. सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार या दोन बालकलाकारांचे येथे विशेष कौतुक करावे लागेल. हे दोघेही पडद्यावर इतक्या सहजरित्या वावरले आहेत की, हा त्यांचा पहिला चित्रपट आहे याची शंका येते. सोमनाथने साकारलेला सुरूवातीचा संयमी जब्या आणि त्याची चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगातील बंड प्रवृत्ती चित्रपटाचा मुख्य हेतू साध्य करण्यात यशस्वी ठरते. किशोर कदम हा अभिनेता नेहमीच आपली प्रत्येक भूमिका अगदी चोखपणे पार पाडत आला आहे. या चित्रपटातही त्याने कुठेच नाव ठेवायला जागा ठेवलेली नाही. चित्रपटाचे संवाद लिहण्याची जबाबदारी नागराज सोबत भूषण मंजुळे यांनी पेलली आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेले ‘तुज्या पिरतीचा इंचू मला चावला’ असे शब्द असलेल्या गाण्याचे रांगडे शब्द, खडा आवाज आणि हलगीचा नाद डोक्यात घर करून बसतो. आलोकनंद दासगुप्ता यांनी दिलेलं पार्श्वसंगीतही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. अनेक प्रसंगांमध्ये पडद्यावर घडणा-या प्रसंगांमध्ये कुठलेलेही शब्द नसताना, पार्श्वसंगीत आपली जबाबदारी चोख बजावतं. चित्रपटाची कथा ही फार धीम्या गतीने पुढे सरकत असली तरी ज्या प्रसंगाने या चित्रपटाचा शेवट झाला आहे त्यावरून त्या गतीचा उलगडा हा शेवटी होतो. त्यामुळे चंदन अरोरा यांना संकलनाचे शंभर गुण द्यावेच लागतील. चित्रपटी आणखी एक जमेची बाजू म्हणजे, चित्रिकरण स्थळं. चित्रपटात कुठेही सेट उभारलेला नसून, प्रत्यक्ष गावात जाऊन चित्रिकरण केलेले आहे. त्यामुळे विषयाचे वास्तव अधिकच अधोरेखित होते. निलेश नवलखा आणि विवेक कजरिया हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2014 1:34 am

Web Title: film review fandry marathi movie
टॅग Marathi Movie
Next Stories
1 सलमानच्या हातात कात्री आणि रणबीर विकतो वडापाव!
2 शादी के लड्डू…
3 शंकर महादेवन यांच्या आवाजातील प्रेमगीत ‘रंग तू..’!
Just Now!
X