News Flash

चित्रीकरण पुढील आठवडय़ापासून

मालिकांचे नवे भाग १३ जुलैला प्रसारित करण्याचा प्रस्ताव

चित्रीकरण पुढील आठवडय़ापासून
संग्रहित छायाचित्र

टाळेबंदीमुळे तीन महिन्यांपासून ठप्प असलेल्या मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाची गजबज पुन्हा सुरू होणार आहे. राज्य सरकारकडून चित्रीकरणासाठीची परवानगी मिळवण्याचे काम पार पाडल्यानंतर पुढच्या आठवडय़ात प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात करण्याचा निर्णय हिंदी-मराठी मालिका निर्मात्यांनी घेतला आहे.

गेले काही महिने सगळ्याच निर्मात्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने किमान चित्रीकरण सुरू झाल्यानंतर सगळ्याच वाहिन्यांनी आपापल्या मालिकांचे नवे भाग एकाच दिवशी म्हणजे १३ जुलैला प्रसारित करावेत, असा प्रस्ताव निर्मात्यांनी ब्रॉडकास्टर्ससमोर ठेवला आहे.

साधारणपणे २३ किंवा २५ जूनला चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येईल. सध्या सेटवर नियमांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती निर्माता नितीन वैद्य यांनी दिली.

मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाला राज्य सरकारने सशर्त मंजुरी दिली. मात्र त्यासाठी वाहिन्यांना परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. गोरेगाव येथील चित्रनगरीत परवानगी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुभाष बोरकर यांनी दिली. गुरुवारी जवळपास चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या १७, तर बाहेरच्या परिसरातील २५ मालिका-चित्रपटांना परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात ९० हिंदी-मराठी मालिकांच्या चित्रीकरणाला पुढच्या आठवडय़ात सुरुवात करणार आहोत, असे नितीन वैद्य यांनी सांगितले. नियमांचे काटेकोरपणे पालन करून चित्रीकरण करावे लागणार असल्याने हिंदी आणि मराठी मालिकांचे निर्माते एकमेकांशी चर्चेतूनच एकत्रित निर्णय घेत आहेत. सध्या प्रत्येक निर्माता आपापल्या निर्मितीसंस्थेतील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेऊन चित्रीकरण कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन-प्रशिक्षण देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

‘खबरदारी घेण्याची गरज’

चित्रीकरण करत असतानाच्या अनेक सवयी आता बदलाव्या लागणार आहेत. स्पॉटबॉयकडून पाण्याच्या बाटल्या घेणे, सहज एकमेकांच्या हातात आपले मोबाइल देणे अशा छोटय़ा-छोटय़ा गोष्टी आता टाळाव्या लागणार आहेत. त्यामुळे एकमेकांचा स्पर्श टाळून काम कसे करता येईल, याचे मार्गदर्शन देणे आवश्यक ठरते आहे. अनेक तंत्रज्ञ दूर राहतात. ते सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून सेटवर पोहोचणार. त्याऐवजी पुढचे काही दिवस सेटच्या आसपासच त्यांना एकत्रित राहण्याची सोय करता येईल जेणेकरून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे सोपे होईल आणि कामही थांबणार नाही, अशा काही उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 12:30 am

Web Title: filming from next week abn 97
Next Stories
1 आलियाच्या लोकप्रियतेला ओहोटी?; ७५ टक्के प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यास दिला नकार
2 ‘आग लगे बस्तीमें……’ म्हणत सोनाक्षी सिन्हाने डीअ‍ॅक्टीव्हेट केलं ट्विटर अकाऊंट
3 “बिंग ह्युमन संस्थेआड होतात आर्थिक गैरव्यवहार”; अभिनव कश्यपचा धक्कादायक आरोप
Just Now!
X