निर्बंधांनंतर आपापला प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्याचे आव्हान सध्या वाहिन्या आणि मालिकांच्या निर्मात्यांसमोर असून प्रेक्षकांना सतत नवा आशय देत त्यांना आपल्याशी जोडून ठेवण्याच्या उद्देशाने हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांच्या निर्मात्यांनी गोवा, हैदराबाद, कर्नाटक, सिल्वासा अशा विविध राज्यांत चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

मालिकांमधील निवडक कलाकार आणि तंत्रज्ञांचा चमू बाहेरगावी चित्रीकरणासाठी पोहोचला असून या आठवड्यात नवीन ठिकाणी चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे वाहिन्यांच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात नव्याने लागू केलेल्या निर्बंधांमुळे मालिका-चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी आली. मात्र, चित्रीकरणात खंड पडू नये यासाठी हिंदी वाहिन्यांनी आपल्या मालिकांचे चित्रीकरण बाहेरगावी हलवले होते. आधीच वाहिन्यांना आयपीएल सामन्यांमुळे प्रेक्षकवर्ग टिकवणे अवघड जात आहे, त्यात सध्या लोकप्रिय असलेल्या मालिकांचे नवे भाग पाहता आले नाहीत तर प्रेक्षक नवीन पर्याय शोधतील. त्यामुळे खर्च वाढला तरीही कलाकार आणि तंत्रज्ञांची सुरक्षितता लक्षात घेऊन चित्रीकरण सुरळीत सुरू राहिले पाहिजे, असा विचार करून ‘झी मराठी’ आणि ‘स्टार प्रवाह’ या दोन वाहिन्यांवरील जवळपास सर्वच मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात येत आहे.

वाहिन्यांचे म्हणणे…

‘बाहेरगावी चित्रीकरण केल्याने या दिवसांत प्रेक्षकांना नवीन आशय देणे आम्हाला शक्य होते आहे. सध्या संचारबंदीच्या काळात लोकांना घरात थांबवण्याचे काम मालिकांमुळे होऊ शकते. त्यामुळे आम्ही निर्मितीच्या खर्चात वाढ करत बाहेर चित्रीकरणाची तयारी केली आहे. सध्या परराज्यात तेथील नियम पाळून चित्रीकरणस्थळीच राहून काम पूर्ण करणेही शक्य होते आहे. इथून जाणाऱ्या कलाकारांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेण्यात आल्या आहेत. ज्यांना करोनाची लागण झालेली नाही किंवा लक्षणे नाहीत अशांना घेऊनच बाहेरगावी चित्रीकरण करण्यात येत आहे’, अशी माहिती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी दिली. ‘झी मराठी’ वाहिनीवरील जवळपास सर्वच मालिकांचे चित्रीकरण बाहेरच्या राज्यांमध्ये सुरू झाले आहे. गुजरात, गोवा, कर्नाटक, बेळगाव अशा ठिकाणी मालिका आणि त्यांचे कलाकार-तंत्रज्ञ पोहोचले आहेत, अशी माहिती वाहिनीच्या सूत्रांनी दिली. जयपूरमध्ये ‘झी समूहा’चा स्वत:चा स्टुडिओ असून तिथेही चित्रीकरण करण्यात येणार आहे. या स्टुडिओत ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘सारेगमप’ या कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्याची तयारी सुरू आहे, पण त्याला थोडा वेळ लागणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील बहुतांशी मालिकांचे अधिक भाग चित्रित झालेले आहेत. त्यामुळे लगेच बाहेरच्या राज्यात जाऊन चित्रीकरण करण्याची वाहिनीची तयारी नाही. मात्र तशी वेळ आल्यास सर्वाधिक लोकप्रिय मालिकांचे चित्रीकरण बाहेरगावी करण्यात येईल. त्या दृष्टीने गोवा आणि हैदराबाद येथे निर्मात्यांची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोवा, कर्नाटक, उमरगावच्या बरोबरीने दीव-दमण येथेही मालिकांचे चित्रीकरण करण्याच्या प्रयत्नात मराठी मालिकांचे निर्माते आहेत, अशी माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली.

चित्रीकरण कुठे?

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या दोन मालिकांचे चित्रीकरण गोव्यात होणार आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘स्वाभिमान’, ‘सहकु टुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’ आणि ‘सांग तू आहेस का’ या मालिकांचे चित्रीकरण सिल्वासामध्ये करण्यात येणार आहे. याच वाहिनीवरील ‘फु लाला सुगंध मातीचा’ या मालिके तील कलाकार आधीच अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांचे चित्रीकरण बुधवारपासून सुरू झाले आहे. अन्य मालिकांमधील कलाकार एक-दोन दिवसांत चित्रीकरणस्थळी पोहोचणार आहेत.