काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘ऑक्टोबर’ या चित्रपटाने समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे. एका वेगळ्याच कथानकाला न्याय देणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि बनिता संधू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘ऑक्टोबर’च्या निमित्ताने या दोघांच्याही अभिनयाचीसुद्धा बरीच प्रशंसा करण्यात येत आहे. पण, ऐन एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या वाटेत एक अडचणही आली आहे. हेमल त्रिवेदी या दिग्दर्शिकेने ऑक्टोबर हा चित्रपट पूर्णपणे ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ या चित्रपटाची कॉपी करुन साकारण्यात आल्याचा आरोप लावला आहे.

हेमल यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहित ही गोष्ट सर्वांच्याच लक्षात आणून दिली. ज्या माध्यमातून त्यांनी शूजित सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. ‘सरकार यांनी फक्त चित्रपटाचं कथानक जसंच्या तसं वापरलं नाही, तर त्यांनी मूळ चित्रपटातून काही दृश्यांचीही अगदी हुबेहूब पुनरावृत्ती केली आहे. शूजितने आरती मेने यांचा मराठी चित्रपट ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ हा मराठी चित्रपट चोरून ‘ऑक्टोबर’ साकारला आहे. सारिकाच्या भावाच्या खऱ्या आयुष्यातील कथेपासूनच आरती… साकारण्यात आला होता.’, असं म्हणत या पोस्टमधून काही महत्त्वाचे खुलासे करण्याच आले आहेत.

‘ऑक्टोबर’ साकारण्यापूर्वी कधीही त्याच्या कॉपीराइट्सविषयी मराठी चित्रपटांशी संलग्न व्यक्तींशी बोलणं झालं नसल्याचं स्पष्ट करत सारिका मेने यांच्याशीही कोणीच कधी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला नव्हता, असंही या पोस्चमधून म्हटलं गेलं आहे.

वाचा : मित्राच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे सचिन मुंबईच्या रस्त्यावर खेळला क्रिकेट

दरम्यान, सारिका मेनेने ‘ऑक्टोबर’च्या निर्मात्यांविरोधात विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशन आणि स्क्रीन रायटर्स असोसिएशनकडेही याविषयीची तक्रार केली आहे. पण, ऑक्टोबरच्या निर्मात्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहे. आपण ‘आरती…’ या चित्रपटाबद्दल आपण फारसं ऐकलं नसल्याचंही या चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. किंबहुना हे सर्व प्रकरण पाहता रायझिंग सन पिक्चर्सकडून एक परिपत्रकच जारी करण्यात आलं आहे. तेव्हा आता या प्रकरणाला पुढे काय वळण मिळणार याकडे कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.