बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली आहे. रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंहने १४ जूनला वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी अनेकांची चौकशी करुन जबाब नोंदवला असून यामध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.

संजय सिंग यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “रिया चक्रवर्तीविरोधात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही उल्लेख आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे”.

“याशिवाय चार सदस्यांचं एक पथक मुंबईला पाठवण्यात आलं आहे. हे पथक मुंबई पोलिसांकडून केस डायरी तसंच इतर महत्त्वाची कागदपत्रं घेणार असल्याची,” माहिती संजय सिंग यांनी दिली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली जात आहे. ही मागणी करणाऱ्यांमध्ये भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी, भाजपा खासदार निशिकांत दुबे, पप्पू यादव, तेजस्वी यादव, अभिनेता शेखर सूमन तसंच रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. रिया चक्रवर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्रही लिहिलं आहे.