चित्रपटसृष्टीमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. यामध्ये या बदलांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोलाचा वाटा आहे. वेगवेगळ्या कथा, संगीत क्षेत्रात करण्यात येणारे नवनवीन प्रयोग, अभिनय कौशल्य या साऱ्या गोष्टींमध्ये दिवसागणिक बदल होताना दिसतात. मात्र या साऱ्यामध्ये प्रत्येकाचं लक्ष जर का कोण वेधून घेत असेल तर ते म्हणजे ‘व्हिएफएक्स.’ त्यामुळे पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये व्हिएफएक्सचा भरणा असलेल्या १०० मराठी लघुपटांची निर्मिती करण्यात येणार आहे.
व्हिएफएक्स हे एक असे तंत्रज्ञान आहे की त्याच्या माध्यमातून ते ठराविक दृश्याला जिवंत करते आणि त्यामुळे चित्र अधिक उठावदार दिसते. मराठीत चित्रपटाला सध्या चांगले दिवस आलेल आहेत अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आपल्या प्रेक्षकांना नक्की काय हवं आहे हे चित्रपट उद्योजकांनी चांगलंच ओळखलेलं आहे, अशीच एक अॅनिमेशन जगातील नामवंत कंपनी “आयरिऍलिटीज” मराठीत कधीही न झालेला प्रयोग करण्यासाठी सज्ज झालेला आहे.
“आयरिऍलिटीज” अॅनिमेशन कंपनी मागच्या दशकापासून अद्यावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. त्यानंतर या कंपनीने त्यांचा मोर्चा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळवला आहे. हॉरर आणि सस्पेंस या दोन सर्वात ताकदीच्या पण तेवढ्याच आव्हानात्मक विषयांवर तब्बल १०० लघुपटांची निर्मिती करणार आहे. हा मराठी सिनेसृष्टीतील पाहिलावहिला प्रयोग असल्याने सर्वांचे लक्ष या अनोख्या प्रयोगाकडे वेधलेलं आहे.
आयरिऍलिटीज अॅनिमेशन कंपनीने शंभर कोटीच्या क्लबमध्ये जाणाऱ्या पहिल्या भारतीय अॅनिमेशन ‘४ साहेबजादे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच सध्या ते चर्चेत असलेल्या क्रिकेटपटू ‘विराट कोहली’ च्या ‘सुपर व्ही’ या अॅनिमेशन पटावर देखील काम करत आहेत. आयरिऍलिटीज कंपनीचे सीईओ प्रसाद अजगांवकर गेली अनेक वर्ष अॅनिमेशन क्षेत्रात कमालीची कामगिरी करत असून आता बॉलिवूड आणि हॉलिवूड नंतर ते मराठीतदेखील आपला यशाचा झेंडा रोवण्यासाठी उत्सुक आहेत.
“आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की, आयरिऍलिटीज सध्या हॉलिवूड तसेच बॉलिवूड अॅनिमेशन क्षेत्रात कमालीची कामगिरी बजावत आहेत आणि आता त्याच उत्साहात आम्ही मराठी सिनेक्षेत्रात झेप घेत आहोत,निर्माते प्रसाद अजगांवकर यांनी सांगितलं. सध्याही कंपनी काही नामवंत टेलिव्हिजन चॅनेल तसेच ३ मोठ्या अॅनिमेशन सिनेमांचे काम करत आहे. मराठीत या १०० चित्रपटांची क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून अभिनेत्री रिना अगरवाल कार्यरत होणार आहे.