flashback, ajay devgn

आपल्या लयबध्द चालीने ओळखला जाणारा देव आनंद ट्रकवर कसा काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण ती वेळच तशी आली म्हटल्यावर काय हो? १९८६ च्या ऐन दिवाळीत संपूर्ण चित्रपटसृष्टी महिनाभर संपावर होती, मुहूर्तापासून पार्ट्यांपर्यंत सगळे कसे चिडीचूप. का, तर शासनाने आपल्या बऱ्याच मागण्या पूर्ण कराव्यात ही अपेक्षा. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून गिरगावातील ऑपेरा हाऊस चित्रपटगृहापासून राजभवनापर्यंत फिल्मवाल्यांचा मोर्चा निघाला. त्या काळातले सगळे वलयांकित चेहेरे त्यात सामील. कोणी रस्त्यावरून चालत चालत निघाले, तर कोणी असे ट्रकवर बसून. आपल्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात दूर्मिळ क्षण. खरं तर प्रचंड मोठी अर्थिक उलाढाल असणाऱ्या या माध्यम आणि व्यवसायाला खरंच काही अडचणी असू शकतात असे चित्रपटाचा पब्लिक कधी मानायलाच तयार नसतो. म्हणून तर अशा संपाच्या निमित्ताने कलाकार दर्शन घडतय अशा दृष्टी आणि भावनेने त्याकडे पहावे ही सर्वकालीन अपेक्षा आहे. देवसाहेब कायम चाहत्यांच्या प्रेमाचे भुकेले, ते अशा क्षणीही तशाच वृत्तीने वागले तर त्यात त्यांचीही चूक काय? १९८६ सालची दिवाळी या गुलाबी-हौशी-उत्साही सिनेमावाल्यांसाठी काळी म्हणून तेव्हा गणली गेली, तरीही त्यात असे काही रंगतदार क्षण होते म्हणजे ‘देव’च पावला म्हणायचे.