मानसी जोशी

टाळेबंदीमुळे जाहिरातींचा ओघ कमी झाल्याने दिवसरात्र श्रोत्यांचे मनोरंजन करणाऱ्या खासगी एफएम वाहिन्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहिन्यांनी प्रक्षेपणाचे तास कमी केले असून कार्यक्र माच्या सादरीकरणातही बदल केले आहेत. बरेचसे रेडिओ जॉकी वा इतर कर्मचारी घरूनच काम करत आहेत. इंटरनेटच्या वेगाचा कामावर परिणाम होत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरिही त्यांनी सादरीकरण सुरू ठेवले आहे.

करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीचे पडसाद सर्वच माध्यमांवर उमटले. त्याची झळ एफएम वाहिन्यांनाही बसली. त्यातही विविध प्रकारे या वाहिन्या श्रोत्यांचे मनोरंजन करत आहेत. प्रसंगी मदतीचा हातही पुढे करत आहेत. सध्या मुंबईत सोळा खासगी एफएम वाहिन्या आहेत. टाळेबंदीमुळे त्यांचे उत्पन्नही कमी झाले आहे. ‘या दोन महिन्यात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने वाहिन्यांचा जाहिरातींचा ओघ कमी झाला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन, मनोरंजन सोहळे, बांधकाम क्षेत्र याकडून जाहिराती मिळतात. मात्र, त्या बंद झाल्याने वाहिन्यांचे आर्थिक गणित जुळवणे कठीण होत आहे. तुलनेने छोटय़ा शहरातील एफएम वाहिन्या स्थानिक जाहिरातींवरच अवलंबून असल्याने त्या त्यातल्या त्यात तगल्या आहेत,’ असे एका नामांकित वाहिनीच्या जाहिरात विभागात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

टाळेबंदीमुळे सर्वच कर्मचारी घरातून काम करत असल्याने वाहिन्यांनी प्रक्षेपणाचे तास कमी करत सादरीकरणात बदल केले आहेत. काही वाहिन्यांनी ‘गाना’, ‘स्पॉटीफाय’ यासारख्या अ‍ॅपशी हातमिळवणी केली आहे. यात लोकप्रिय लेखकांच्या कविता, कथांचे अभिवाचन करण्यात येत आहे. यामुळे वाहिनीवरील कार्यक्रम प्रेक्षकांना समाजमाध्यमावरही ऐकायला मिळत आहेत. सध्या आरोग्याविषयक सूचना, टाळेबंदीतील किस्से, सर्वसामान्य लोकांचे अनुभव याला प्राधान्य देत असल्याचे आरजे तेजश्री फुलसुंदर हिने सांगितले.

मदत पोहोचवणारे प्रभावी माध्यम

टाळेबंदीत एफएम वाहिन्या सर्वसामान्यांना मदत पोहोचवणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. या माध्यमाची व्याप्ती जास्त असल्याचे करोनाबाधित रूग्णांची संख्या, सुरक्षेचे उपाय, महत्वाच्या घडामोडी यासाठी संबंधित जिल्ह्य़ाचे अधिकारी, महापालिकांचे आयुक्त फोन करून कळवतात. ‘आमची वाहिनी राज्यातील सहा शहरात सुरू आहे. दररोज मदतीसाठी चार ते पाच फोन येतात.  यामुळे अनेक स्थलांतरित कामगारांना मदत मिळाली आहे. अहमदगरमधील एका बाल सुधारगृहात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची गरज भासत होती. रेडियोवरून आम्ही

श्रोत्यांना मदतीचे आवाहन केले. काही सामाजिक संस्थांनी त्यांना मदत केली,’  असे चैत्राली जावळे हिने सांगितले.