04 August 2020

News Flash

व्हिडिओ पाहाः निमित्त फँड्रीचे

जन्माने त्याला मिळालेली जात आणि जातीने तथाकथित समाज नावाच्या व्यवस्थेत त्याला मिळालेले स्थान यामुळे त्याच्या वाटय़ाला आलेला संघर्ष असेल..

| February 23, 2014 12:51 pm

माणूस म्हणून प्रत्येकाचा एक वेगळा संघर्ष असतो. मग तो त्याच्या परिस्थितीनुरूप असेल, जन्माने त्याला मिळालेली जात आणि जातीने तथाकथित समाज नावाच्या व्यवस्थेत त्याला मिळालेले स्थान यामुळे त्याच्या वाटय़ाला आलेला संघर्ष असेल.. हा संघर्ष, असं जगावं ही आतून असलेली उर्मी आणि तसं जगता येणार नाही हा जगाने दिलेला अनुभव यातून माणूसमन घडतं. कधीतरी मग शिक्षणाने असेल किंवा परिस्थिती बदलल्याने असेल तेच मन जेव्हा या कुंपणातून बाहेर पडतं आणि मग मागे वळून पाहताना कुंपणातलं ते अस्वस्थ, मनात साचून राहिलेलं जगणं पडद्यावर उतरतं तेव्हा ‘फँड्री’सारखी कलाकृती जन्माला येते. मनातल्या उर्मीला मारून टाकणारं जगणं, त्यातली अस्वस्थता इतरांच्या काळजालाही भिडली आहे हे ‘फँड्री’ला मिळालेल्या विविध पुरस्कारांवरून आणि प्रतिक्रियांवरून सिध्द झालं आहे. पण, एक सर्वसामान्य माणूस ते दिग्दर्शक हा प्रवास अनुभवणाऱ्या नागराज मंजूळे आणि त्यांच्या टीमचे ‘फँ ड्री’ जगतानाचे अनुभव खास वाचकांसाठी.. ‘फँ ड्री’ माझ्या जगण्याची गोष्ट आहे हे दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. पण, ‘फँ ड्री’ची कथा-पटकथा लिहित असताना त्यांचं ते जगणं त्यांनी पुन्हा अनुभवलं. ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात रंगलेल्या गप्पांच्या कार्यक्रमात नागराज मंजूळे यांनी चित्रपटातली जब्याच्या मनातली अस्वस्थता, न्यूनगंड आपल्यात कसा आणि का निर्माण झाला होता याचा अनुभव सांगितला.

.
सिनेमातला जब्या साकारताना अनुभवी कलाकार नको होता, असे नागराज मंजूळे यांनी सांगितलं. हलगी वाजवणाऱ्या काळ्या, उंच सोमनाथला पाहून हाच आपला जब्या असं त्यांच्या मनात आलं तरी जब्या साकारण्यासाठी सोमनाथने मात्र तीन महिने त्यांना पळवलं. एकीकडे सोमनाथची ही तऱ्हा तर पिऱ्या साकारण्यासाठी सूरजचा विचार त्यांनी केला नव्हता. सूरजने त्यांच्या ‘पिस्तुल्या’त काम केलं होतं आणि त्याला पुरस्कारही मिळाला होता. पण, सूरज खूप बारीक आहे त्यामुळे या चित्रपटात त्याला घेता येणार नाही असं नागराजच्या मनाने घेतलं होतं. सूरजला मात्र काहीही करून चित्रपटात काम हवं होतं. म्हणून त्याने वाट्टेल ते प्रयत्न केले आणि सातत्याने ऑडिशन देत राहिला. शालू ही त्यांनी अगदी गावातली साधी मुलगी वाटावी अशीच हवी होती. राजेश्वरी शालूच्या भूमिकेत साधी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र चित्रपटात काम करायचं हे ऐकूनच तिने आणि तिच्या बहिणीने घरात धुमाकूळ घातला होता. या तिन्ही मुलांमुळे एक मोठी गोष्ट नागराजच्या हातात लागली होती ती म्हणजे त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर या तिघांसह अन्य कलाकारांचीही भाषा, त्यांची संवाद बोलण्याची ढब, हेल एकच वाटला. वेगवेगळे कलाकार येऊन एकच भाषा बोलायचा प्रयत्न करत आहेत असं वाटलं नाही इतकं सहजपणे ते जमून आलं…

आणि सारा वर्ग माझ्याकडे पाहून हसला
हा चित्रपट म्हणजे माझ्या जगण्याची गोष्ट आहे. लहानपणापासून जे पाहिले, अनुभवले, जाती व्यवस्थेचा एक भाग म्हणून जे काही बरे-वाईट अनुभव वाटय़ाला आले ते कुठेतरी मनात साचलेले होते. लहानपणापासूनच किंवा मला कळायला लागल्याच्या वयापासूनच मनात न्युनगंड आला होता. जात, रंग, रूप, समाजातील स्थान, मिळालेली वागणूक, आजुबाजूचे लोक, समाज यांच्याकडून आलेल्या अनुभवातून हा न्युनगंड अधिक ठळक होत गेला. अगदी साधी बाब म्हणजे माझे नाव. ‘नागराज’ म्हणजे चित्रपटातील खलनायकाचे असलेले नाव माझे होते. नायकांची नावं कशी असतात प्रेम, आदित्य..तसं माझं नाव नव्हतं आणि ते तसं का नव्हतं याचं उत्तरही माझ्या बापाक डे नव्हतं. लहान वयात अगदी साध्या, क्षुल्लक वाटणाऱ्या माझ्या गरजा पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. मग यात शाळेत जाण्यासाठी भाडय़ाने सायकल घ्यावीशी वाटणं असो. अगदी छोटय़ा गोष्टी. जीन्सची पँट हे तेव्हा माझ्यासाठी मोठं स्वप्न होतं. या सगळ्या नाकारल्या गेलेल्या गोष्टीतून एक न्यूनगंड तयार होत गेला.
माझा हा न्यूनगंड कमी होण्याऐवजी तो वाढवणाऱ्याच घटना माझ्या वाटय़ाला यायच्या. महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला श्री. म. माटे यांचा एक धडा होता. मला पुस्तक वाचायची आवड असल्याने माटे असोत किंवा कोणीही बऱ्याचशा लेखकांची पुस्तकंच्या पुस्तकं वाचून काढली होती. त्यामुळे माटेंनी लिहिलेल्या त्या कथेत एका गवंडी कामगाराकडून मुलीची छेड काढली जाते, तेव्हा ती मुलगी त्याची ‘काळ्या वडऱ्या’अशा शब्दांत संभावना करते, असा प्रसंग होता हे मला आधीपासूनच माहिती होते. तो शब्द माझ्यासाठीच लिहिलेला आहे त्यामुळे हा धडा शिकवताना आपण वर्गात असलो तर सगळे काळ्या रंगामुळे आपल्याकडेच पाहतील, अशी मनात भीती होती. त्यामुळे मी काही दिवस चक्क दांडी मारली होती. महाविद्यालयात जाणं टाळत होतो.  त्या दिवसांत हा धडा शिकवून झाला असेल, असं मला वाटलं होतं. पण, तसं व्हायचं नव्हतं. मी नेमका ज्या दिवशी वर्गात गेलो, त्याच दिवशी हा धडा शिकवला गेला. आणि त्या प्रसंगातला ‘काळ्या वडऱ्या’ असा शब्द बाईंनी उच्चारल्यानंतर संपूर्ण वर्ग माझ्याकडे पाहून खदाखदा हसला होता. ‘हाच तो’ असा कुत्सित भाव त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होत होता.
वास्तवाचं भान हे तेव्हापासून आलं होतं. आपल्याकडे आजुबाजूचे लोक कुत्सित नजरेने पाहतात, हसतात त्याचं खूप वाईट वाटायचं. आपलाही सन्मान व्हावा, मान मिळावा, असं आतून वाटायचं. ‘फँड्री’ तयार करण्याचा विचार मनात आला तेव्हा आपल्या जगण्यातल्या गोष्टी त्यात मांडल्या पाहिजेत, असं मी ठरवलं होतं.

माणसाच्या मनातील माणुसकीला आवाहन
हा चित्रपट खूप चांगला आहे, पाहिल्यानंतर अस्वस्थ करतो इथपासून ते यात काही नाही, फालतू आहे, असे म्हणून हसण्यावारी नेणारे असे वेगवेगळे अनुभव सध्या येत आहेत. काहींना हा चित्रपट प्रायोगिक वाटतो आहे. पण मला तसे वाटत नाही. सर्वसामान्य माणूस, बुद्धिजीवी ते अगदी अडाण्यापर्यंतच्या प्रेक्षकांना हा चित्रपट समजतो, कळतो. हा चित्रपट पाहतांना प्रत्येक जण त्याच्याशी जोडला जातो. ही प्रत्येकाला आपली गोष्ट वाटते. जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्या भींती ओलांडून हा प्रत्येकाला आपला वाटतो. ‘फँड्री’ चित्रपट प्रत्येक माणसाच्या मनातील माणुसकीला, त्याच्यातील माणसाला आवाहन करतो. चित्रपटात जे आणि जसे आहे ते तसेच मांडले आहे. प्रेक्षकांना आवडावे म्हणून वेगळे असे काहीही केलेले नाही. म्हणूनच प्रेक्षकांना ते भावले आणि थेट मनाला भिडले असावे.
नागराज मंजुळे (दिग्दर्शक)
आणि आम्ही सिनेमा केला
सिनेमा म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. मला मुळी कामच करायचं नव्हतं. हलगी वाजवताना मला नागराज दादाने बघितलं आणि त्याने सिनेमासाठी विचारलं पण, तेव्हा मला जमणार नाही. मला काय आवड नाही.. असं सांगून मी पळालो होतो. पहिल्यांदा नागराज दादाला पाहिल्यावर हा दिग्दर्शक तरी आहे का?, असाच प्रश्न माझ्या मनात आला होता. पण, तो रोज घरी येतच राहिला. माझ्या नकळत माझ्या वडिलांनी परवानगी देऊन टाकली होती. पण, मी तयार नव्हतो. हे घरी आले की मी धूम पळून जायचो. तासचे तास घरी यायचो नाही. पण, तीन महिने सतत घरी येत होते. त्यांनी काय माझा नाद सोडला नाही..  मग मीच एकदिवस सेटवर गेलो. आणि काम करायचंय सांगितलं. सेटवर खूप मजा होती. चांगलं भरपेट खायला मिळायचं. मी काय करतो आहे हे मला फारसं कळायचं नाही. नागराज दादाने अमूक एक किंवा या प्रकारे अभिनय करा, तमूक प्रसंगात असं वागा, अशा सूचना कधी दिल्या नाहीत. फक्त तो सांगायचा आणि आम्ही तसं वागायचो. खरं तर आम्ही चित्रपटाचं चित्रीकरण करतोय, असं कधीच वाटलं नव्हतं पण, ज्या दिवशी सिनेमा स्वत: पाहिला तेव्हा मला काय झालं माहिती नाही. ढसाढसा रडलो आणि तीन दिवस सतत रडतच होतो..    ’
सोमनाथ अवघडे

मी चित्रपट करणार हेच मला मजेचं वाटत होतं

नागराज दादांनी मला पाहिले होते. ते आणि अन्य काही जण आमच्या घरी आले. ते आले तेव्हा खूप रात्र झालेली होती. हे आता काय करणार, अशी भीती तेव्हा वाटली. पण त्यांनी आम्ही सिनेमाच्या कामासाठी आलो आहोत, असे सांगितले. चित्रपटातील माणसे, तेथील वातावरण याबाबत वडिलांना जरा काळजी वाटत होती. पण नागराज दादा यांनी वडिलांना निर्धास्त केले. चित्रपटासाठी माझी निवड झाली, ती गोष्ट मला आणि माझ्या बहिणीला खूप ‘एक्सयाटिंग’ वाटत होती.
राजेश्वरी खरात

मला काम करायचंच होतं
मी खूप बारीक होतो. बारीक असल्यामुळे ते मला चित्रपटात घेतील की नाही, अशी भीती वाटत होती. आणि ते मला घेणार नाहीत ही माहितीही काढली होती. पण, मला काहीही करून काम करायचं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून मी भरपूर खायला, जेवायला लागलो. फारच खायचो मी तेव्हा आणि त्यामुळे माझ्या तब्येतीत फरक पडला मी थोडा जाडही दिसायला लागलो. मग मला पिऱ्याची भूमिकाही करता आली.
 सूरज पवार


संघर्ष आयुष्याला आकार देतो

मी ‘सत्यदेव दुबे’ स्कूलचा विद्यार्थी आहे. नाटक आणि अभिनयाबाबत येथे मी जे काही शिकलो, अनुभव घेतला आणि घडत गेलो, त्या पद्धतीने मी आजपर्यंत काम करतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांना माझे काम वेगळे वाटते. अर्थात यात श्याम बेनेगेल, गोविंद निहलानी, अमोल पालेकर या आणि अन्य सर्व दिग्दर्शकांचा मोठा वाटा आहे. ‘फॅड्रीं’तील ‘कचरु माने’ मला पूर्णपणे नवीन होऊन साकार करायचा होता. माझा आजवरचा अभिनय, अनुभव आणि जमा केलेले संचित हे सर्व मी उतरवून ठेवले आणि पूर्णपणे नवीन होऊन काम केले.  जर मी अभिनय करायला लागलो तर मला तेथेच थांबव, असे मी नागराजला सांगितले होते. इथे मी अभिनेता म्हणून माझा ‘अहं’ कधी गळून पडला ते माझे मलाच कळले नाही. माणूस म्हणून जगताना प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो आणि हाच संघर्ष माणसाच्या आयुष्याला आकार देत असतो.  

ये ‘फँड्री’ क्या है
‘फँड्री’ प्रदर्शित झाला तेव्हा मी तिग्मांशू धुलियाच्या चित्रपटात काम करत होतो. तर तिथे त्यांच्या सेटवर या चित्रपटाची चर्चा चालू होती. ‘गुंडे’ सारख्या यशराजच्या मोठय़ा हिंदी चित्रपटासमोर ‘फँ ड्री’ जोरात चालतोय. या चित्रपटात एक किशोर कदम हा आपल्या हिंदीतील लोकांसाठी ओळखीचा चेहरा आहे तो सोडून बाकीचे सगळे अगदीच नविन आहेत आणि तरीही चित्रपट चांगला चालतोय, याबद्दल तिग्मांशूने आश्चर्य व्यक्त केलं. दक्षिणेकडील निर्माते-दिग्दर्शक यांच्यातही या चित्रपटाविषयी कुतुहल आहे. हिंदीच्या तुलनेत इतक्या कमी बजेटमध्ये इतका चांगला चित्रपट कसा तयार झाला याचेही ‘बॉलिवूड’च्या या मंडळींना आश्चर्य वाटते आहे. त्यामुळे ‘ये ‘फँड्री’ क्या है’ अशी चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं की ‘फँड्री’च्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक मैलाचा खांब रोवला गेला आहे.
किशोर कदम (अभिनेता)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2014 12:51 pm

Web Title: for the purpose of fandry
टॅग Marathi Movie
Next Stories
1 लिसा हेडन, रॅम्पवरून अवतरलेली नवी ‘क्वीन’
2 गूढ, उत्कंठावर्धक
3 औत्सुक्यपूर्ण तरीही..
Just Now!
X