अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या दोन बहिणी व एका डॉक्टरविरोधात वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून सुशांतच्या बहिणी प्रियांका सिंह, मितू सिंह आणि दिल्लीतील डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

डॉ. तरुण कुमार हे दिल्लीतल्या डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात कार्डिओलॉजीचे असोसिएट प्रोफेसर आहेत. त्यांच्यावर रियाने सुशांतसाठी औषधं उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला आहे. तर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा, फसवणूक केल्याचा आणि षडयंत्र रचल्याचा आरोप रियाने त्याच्या बहिणींवर केला आहे.

आणखी वाचा : कंगनाला मिळालेल्या Y+ सुरक्षेवरून स्वरा भास्करचा सरकारला अप्रत्यक्ष टोला

सुशांतच्या दोन बहिणी व डॉक्टर तरुण कुमार यांच्यावर भारतीय दंड संहितेतील ४२०, ४६४, ४६५, ४६६, ४६८, ४७४, ३०६ आणि १२० बी कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रियाने तिच्या तक्रारीत लिहिलं, ‘८ जून रोजी सुशांतने मला त्याच्या फोनमधील मेसेज दाखवले ज्यामध्ये त्याची बहीण प्रियांकासोबत त्याची चर्चा झाली होती. प्रियांकाने त्याला एक औषधांची यादी पाठवली. रियाने त्यावर आक्षेप घेतला असता सुशांतने बहिणीने सांगितलेलीच औषधं घेणार असल्याचं स्पष्ट केलं.’ याच दिवशी सुशांतने रियाला त्याच्या घरातून निघून जाण्यास सांगितलं होतं. त्याची बहीण मितू सिंह काही दिवसांसाठी घरी येणार असल्याने सुशांतने रियाला घरातून जाण्यास सांगितलं होतं.