प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी भारतीय खूप मोठ्या प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला बॉलिवूडमधील कलाकारांनी प्रतिसाद दिला आहे. चला पाहूया या यादीमध्ये कोणकोणते कलाकार आहेत.

या यादीमध्ये अभिनेता अर्शद वार्सी, काम्या पंजाबी, मिलिंद सोमण, रणवीर शौर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्यांनी अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. नुकताच अर्शदने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने चिनी वस्तूंचा वापर करणे बंद केल्याचे म्हटले आहे.

तसेच मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने देखील आवाहनाला प्रतिसाद देताना एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने “मी आता टिक टॉकवर नाही,” असे म्हणत वांगचुक यांच्या व्हिडिओची लिंक पोस्ट केली आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री काम्या पंजाबीने देखील चाहत्यांनी चिनी वस्तूंचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. ‘माझ्या मोबाईलमध्ये फार कोणते अॅप नाहीत, जे लोकं चिनी वस्तूंचा वापरत आहेत त्यांनी मी विनंती करते की त्या गोष्टींसाठी पर्याय शोधावा’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा दिग्दर्शक राज शांडिल्याने ट्विट करत लोकांनी चिनी वस्तूंचा वापर जितका जमेल तितका करु नका असे म्हटले आहे.

काय म्हणाले होते वांगचुक?
“चीनमधील नागरिकांमधील देशभक्तीची भावना एकत्र आणण्यासाठी आणि तेथील आर्थिक परिस्थितीमुळे उद्रेक होऊन राज्यकर्त्यांविरोधात रोष निर्माण होऊ नये म्हणून चीन आजूबाजूच्या देशांबरोबर काही ना काही विषयावरुन संघर्षाची परिस्थिती निर्माण करु पाहत आहे. आज चीनमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे. मात्र तेथील राजकीय परिस्थितीमुळे देशातील १४० कोटी जनता सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. जनतेमधील असंतोष उफाळून येऊ नये म्हणून त्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी चीन आजूबाजूच्या देशांशी संबंधित अनेक विषयांना हात घालत आहे,” असं वांगचुक म्हणाले आहेत.