उत्तम पटकथा, अभिनय आणि अ‍ॅनिमेशनचा तडका असलेली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेच्या आठव्या सत्राचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती निर्मात्यांनी दिली. तरीही या सत्राची एकही अधिकृत जाहिरात न आल्याने चाहत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही कलाकृतीला मिळणाऱ्या आर्थिक यशात जाहिरातींचा सिंहाचा वाटा असतो. म्हणूनच बिग बजेट चित्रपट व मालिकांचा बराचसा वेळ त्यांच्या जाहिरातीत जातो. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, वर्तमानपत्रे, नियतकालिके या प्रकारच्या जवळजवळ प्रत्येक माध्यमांत त्यांच्या जाहिराती कराव्या लागतात. त्यांच्या कलाकारांच्या मुलाखती, खास शो असे करीत वातावरणनिर्मितीही केली जाते. मात्र या मालिकेची जाहिरातच न आल्याने चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, माध्यमांनी मालिकेत  ‘डॅनेरिस टारगॅरियन’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या एमिलिया क्लार्कशी संपर्क साधून सुरू असलेला सर्व प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या मते निर्मात्यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत मालिकेबद्दल कोणतीही माहिती देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सर्वच कलाकार सध्या शांत आहेत. मात्र या चमत्कारिक आदेशामागील नेमके कारण काय? यावर तिने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे सातवे सत्र इंटरनेट हॅकर्सच्या जाळ्यात अडकले होते. त्यामुळे वेळेआधीच मालिकेचे सर्व भाग लीक झाले आणि निर्मात्यांना कोटय़वधींचे नुकसान सहन करावे लागले होते. परंतु आठव्या सत्रात असे काही घडू नये यासाठी काही खास उपाययोजना केल्या जात आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ने जाहिरात न करताही वातावरणनिर्मिती करून दाखवल्यामुळे हा देखील जाहिरातीचाच एक प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.