स्टार प्रवाह वाहिनीवरील वैजू नंबर वन मालिकेच्या सेटवर बाप्पाचं थाटामाटात आगमन झालं आहे. तिसरी मंझिल चाळीत अगदी वर्गणी गोळा करण्यापासून ते बाप्पाची मूर्ती बनवेपर्यंत सगळं काही उत्साहात पार पडलं आहे. बाप्पाची मूर्ती पर्यावरणपूरक असून चाळीमध्ये एक कृत्रिम तलाव बनवण्यात आलं आहे. या तलावात बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे.

भल्यामोठ्या टॉवरच्या गर्दीत चाळसंस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. त्यामुळे वैजू नंबर वन मालिकेतला उत्साह चाळीतल्या धमाल दिवसांची आठवण नक्कीच करुन देईल.

गणेशोत्सवाची ही धमाल वैजू नंबर वन मालिकेत सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल.

या मालिकेत वैजूची भूमिका साकारणाऱ्या सोनाली पंडीतची मालिकेसाठी निवड हटके पद्धतीने झालीय.

‘वैजू नंबर वन’ मालिकेसाठी निवड कशी झाली?

वैजूसाठी माझी निवड होणं ही स्वप्नवत गोष्ट आहे. खरंतर मी पेशाने शिक्षिका आहे. एम ए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापूरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. याच आवडीमुळे सोशल मीडियावर मी माझे व्हिडिओज पोस्ट करायचे. मिनिटभराच्या व्हिडिओने जर इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटत असेल तर ते करायला काय हरकत आहे असं मला वाटतं. याच दरम्यान वैजू नंबर वन मालिकेसाठी ऑडिशन्स सुरु होते. बऱ्याच अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती. माझे व्हिडिओज पाहून मलाही ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं. इतक्या अनुभवी अभिनेत्रींमधून माझी निवड होईल असं वाटलंच नव्हतं. पण वैजू नंबर वनच्या टीमला माझ्यातली चुणुक दिसली आणि माझी निवड झाली. माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत आहे, असं सोनालीने सांगितलं.